कोरोनाचा कहर, सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू होणार तरी कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:19 IST2021-04-21T04:19:01+5:302021-04-21T04:19:01+5:30

अकोट : कोरोनासारख्या महामारीने मृत्यूचे तांडव सुरू आहे. कोरोना बाधित रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांकडे महागड्या उपचारासाठी पैसे नाहीत. बेड, ऑक्सिजन ...

Corona's havoc, when will the superspeciality hospital start? | कोरोनाचा कहर, सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू होणार तरी कधी?

कोरोनाचा कहर, सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू होणार तरी कधी?

अकोट : कोरोनासारख्या महामारीने मृत्यूचे तांडव सुरू आहे. कोरोना बाधित रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांकडे महागड्या उपचारासाठी पैसे नाहीत. बेड, ऑक्सिजन मिळत नाही. अक्षरश: रुग्णांच्या जीवासोबत खेळ सुरू आहे. त्यांची हेळसांड होत आहे. दररोज लोक मरताहेत तर दुसरीकडे रुग्णांच्या सुविधेसाठी उभारण्यात आलेले सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलची इमारत दिमाखात उभी आहे. परंतु सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू होणार तरी कधी? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. आरोग्य यंत्रणा मृत्यूशय्येवर असून, लोकप्रतिनिधी, अधिकारी ढिम्म असल्याचे चित्र दिसत आहे.

सध्या शासकीय आरोग्य यंत्रणाच कोलमडून पडली आहे. डॉक्टर, परिचारिकांची कमतरता, रुग्णालयांमध्ये बेड नाहीत, व्हेंटिलेटर, ऑक्सिजनची व्यवस्था नाही. सर्व आलबेल सुरू आहे. आरोग्य यंत्रणेला जाब विचारण्याची लोकप्रतिनिधींमध्ये धमक दिसत नाही. सारे काही मिळमिळीत सुरू आहे. कोट्यवधी रुपये खर्च घालून अकोल्यात सुसज्ज सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल उभारले. परंतु त्याचा जनतेसाठी, रुग्णांसाठी कोणताच उपयोग होत नसल्याचे दिसून येत आहे. सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्यासाठी मतभेद बाजूला सारून सामूहिक प्रयत्न करणे सोडून, सत्ताधारी-विरोधकांचे राजकारण सुरू आहे. शासकीय यंत्रणेवर कोणाचाही अंकुश नसल्याने तोकड्या उपचार यंत्रणेमुळे कोरोनाच्या खाईत अकोला जिल्हा लोटल्या जात असल्याचे चित्र आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ३४ हजारावर पॉझिटिव्ह रुग्णसंख्या पोहोचली आहे. कोरोनामुळे ५७५ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. परंतु लोकप्रतिनिधींना त्याचे काही सोयरसुतक नाही. ५ हजारावर ॲक्टिव्ह रुग्ण असून दररोज पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणा तोकडी पडत आहे. शासकीय रुग्णालयातील मूलभूत सुविधा सुमार आहेत. त्यामुळे सर्व सुविधा मिळण्यासाठी खासगी रुग्णालयात महागडे उपचार घ्यावे लागत आहेत. वारेमाप कमाईसाठी डॉक्टरांसह काही लोकांनी पार्टनरशिपमध्ये कोविड केअर सेंटर सुरू केले आहेत. खासगी कोविड सेंटरमध्ये रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची मोठी लूट होत आहे. परंतु या सेंटरवर कोणाचेही नियंत्रण नाही. कोरोना रुग्णांना बेड मिळत नसल्याने वेटिंगवर राहावे लागत आहे. अनेक रुग्ण उपचारापूर्वीच मृत्युमुखी पडत आहेत. परिस्थिती गंभीर होत आहे. दुसरीकडे अकोल्यात सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्यात आले नाही. परिस्थिती हाताबाहेर जात असताना, सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्याची गरज आहे.

फोटो:

१२० कोटी रुपये खर्च करूनही सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल ठरले देखावाच

अकोल्यात १२० कोटी रुपये खर्च करून १५० खाटांचे सुसज्ज असे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल उभे राहिले. परंतु लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे हॉस्पिटल सुरू होऊ शकले नाही. हॉस्पिटलचेही राजकारण सुरू असल्याने, रुग्णांना आरोग्य सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. कोरोना महामारीच्या काळात सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू होत नसून केवळ हॉस्पिटल पांढरा हत्ती ठरत आहे. कोरोना संकटात रुग्णांना बेड मिळत नाहीत. अशावेळी नावालाच ठरलेल्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कोविड केअर सेंटर सुरू केल्याचा रुग्णांना फायदा होऊ शकतो. त्यामुळे त्या दृष्टीने विचार होणे गरजेचे आहे.

मनुष्यबळ, आकृतिबंधाच्या गर्तेत अडकले सुपरस्पेशालिटी

शासनाचे यंत्रणेने मनुष्यबळ व आकृतिबंध नसल्याचे कारण देत, सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलची सेवा ऑक्सिजनवर ठेवली आहे. अशा परिस्थितीत धूळखात पडलेल्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कंत्राटी पद्धतीने वैद्यकीय पथक, सेवाधारी तज्ज्ञ डॉक्टराची सेवा घेत, सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्याची गरज आहे.

Web Title: Corona's havoc, when will the superspeciality hospital start?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.