बार्शीटाकळीत कोरोनाचा कहर; ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या पोहोचली ३००च्या उंबरठ्यावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:19 IST2021-05-09T04:19:44+5:302021-05-09T04:19:44+5:30
बबन इंगळे बार्शिटाकळी: शहरासह तालुक्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच असून, दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. तालुक्यात ॲक्टिव्ह रुग्णांची ...

बार्शीटाकळीत कोरोनाचा कहर; ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या पोहोचली ३००च्या उंबरठ्यावर!
बबन इंगळे
बार्शिटाकळी: शहरासह तालुक्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच असून, दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. तालुक्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या २९५ वर पोहोचली असून, कोरोनाने ३८ रुग्णांचा बळी घेतला आहे. असे असतानाही प्रशासनाने जारी केलेल्या कडक निर्बंधाला नागरिकांकडून हरताळ फासले जात असल्याचा प्रकार दि. ८ मे रोजी शहरातील बाजारपेठेत दिसून आला. बाजारपेठेत नागरिकांची गर्दी कायम असून, नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे चित्र आहे.
रविवार रात्रीपासून अत्यावश्यक सेवा वगळता, सर्वच दुकाने, पेट्रोल पंप, शासकीय कार्यालय, बँक व इतर काही अत्यावश्यक व्यवसायांची दुकाने बंद राहणार असल्याचा आदेश प्रशासनाकडून धडकल्यानंतर, नागरिकांनी विविध सामानांच्या खरेदीसाठी शहरात एकच गर्दी केली होती. ‘ना मास्क, ना फिजिकल डिस्टन्सिंग’ या अभावामुळे नागरिक जीव धोक्यात टाकत असल्याचा प्रकार दिसून आला. प्रशासनाकडून कडक निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर कोरोना संक्रमण थांबविण्यासाठी विविध उपाय योजना सुरू असतानाही नागरिक याला जुमानत नसल्याचे चित्र आहे.
--------------------------
ग्रामीण भागात कोरोनाचा विळखा घट्ट!
तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत चालला आहे. आजपर्यंत तालुक्यात ३८ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, ॲक्टिव रुग्णसंख्या २९५ वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे, तालुक्यातील गावांपैकी २७ गावांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या प्रत्येकी एक असून, इतर सात गावांतील आकडा मात्र वाढत आहे.
-------------------------------------
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी विविध उपाययोजना प्रशासनाकडून राबविल्या जातात. मात्र, तरीही काही नागरिक बिनधास्त असल्याचे चित्र आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध पोलीस, आरोग्य, महसूल, पंचायत, नगरपंचायत आदी विभागांच्या पथकाने कारवाई करण्याची मागणी सूज्ञ नागरिकांकडून होत आहे.
-----------------------------
ग्रामरक्षण समित्या कागदावरच!
ग्रामपंचायत स्तरावर विविध संकटांचे वेळी आपले गावाचे संरक्षण करण्यासाठी व गावातील विविध बाबींवर लक्ष ठेवण्यासाठी ग्रामरक्षण समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. मात्र, वास्तविक या ग्रामरक्षण समित्या कागदावरच असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, गतवर्षीच्या कोरोनाच्या काळात ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन, कोरोनाला वेशीवर रोखण्यासाठी गावबंदी, सॅनिटायझर, जंतुनाशक फवारणी, सॅनिटायझर, मास्कचे वाटप आदी उपाययोजना केल्या होत्या.