अकोल्यात कोरोनाचा विळखा घट्ट; आणखी एकाचा मृत्यू; सात नवे पॉझिटिव्ह; मृतकांचा आकडा ३०
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 12:18 IST2020-05-30T11:43:11+5:302020-05-30T12:18:53+5:30
शनिवारी पहाटे एका ७१ वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे रुग्णांचा आकडाही ३० वर गेला आहे.

अकोल्यात कोरोनाचा विळखा घट्ट; आणखी एकाचा मृत्यू; सात नवे पॉझिटिव्ह; मृतकांचा आकडा ३०
अकोला : अकोल्यात कोरोना संसर्गाचा विळखा घट्ट होत असून, दिवसेंदिवसे रुग्णांची संख्या वाढतच आहे. शनिवार, ३० मे रोजी आणखी सात रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात कोरोनाची बाधा झालेल्यांची संख्या ५६५ झाली आहे. दरम्यान, शनिवारी पहाटे एका ७१ वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे रुग्णांचा आकडाही ३० वर गेला आहे. आतापर्यंत ३८८ रुग्ण बरे झाल्याने आता १४७ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने शनिवारी सकाळी दिली.
विदर्भातील सर्वाधिक कोरोनाची लागण झालेले रुग्ण अकोल्यात असून, कोरानाचे सर्वाधिक बळीही अकोल्यात गेले आहेत. शुक्रवार, २९ मे रोजी जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ५५८ होता. यामध्ये शनिवारी सात नव्या रुग्णांची भर पडत हा आकडा वर ५६५ गेला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल प्रयोगशाळेकडून शनिवारी ४९ अहवाल प्राप्त झाले. यापैकी सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत, तर ४२ जणांचे अहवाल निगेटिव्ह असल्याचे निदान झाले आहे. आज पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पाच महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. हे रुग्ण बाळापूर, आलेगाव पातूर, तसेच रामदासपेठ, शरीफ नगर, राधाकिसन प्लॉट, गायत्री नगर, फिरदौस कॉलनी येथील रहिवासी आहेत. दरम्यान, डाबकी रोड भागातील साई नगरातील एका व्यक्तीचा शनिवारी पहाटे मृत्यू झाला. सदर व्यक्तीला २४ मे रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
जिल्ह्यात आतापर्यंत ३० कोरोनाब् ााधितांच्या मृत्यूची नोंद आहे. यापैकी २९ जणांचा मृत्यू कोविड-१९ आजारामुळे, तर एका कोरोनाबाधिताने आत्महत्या केली आहे. आतापर्यंत ३८८ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून, सद्यस्थितीत १४७ जणांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
प्राप्त अहवाल-४९
पॉझिटीव्ह-सात
निगेटीव्ह-४२
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल- ५६५
मयत-३०(२९+१),डिस्चार्ज- ३८८
दाखल रुग्ण (अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)- १४७