कोरोनाचा प्रेरणा प्रकल्पाला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 11:00 IST2020-08-19T11:00:43+5:302020-08-19T11:00:49+5:30
प्रेरणा प्रकल्पांतर्गत डॉक्टरांनी ग्रामीण भागात भेटी न दिल्याने अनेक मनोरुग्णांचा उपचार अर्ध्यातच खुंटला आहे.

कोरोनाचा प्रेरणा प्रकल्पाला फटका
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शेतकऱ्यांसह इतरांनाही नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी सुरू असलेल्या प्रेरणा प्रकल्पाला कोरोनाचा फटका बसला आहे. मागील चार ते पाच महिन्यांच्या काळात प्रेरणा प्रकल्पांतर्गत डॉक्टरांनी ग्रामीण भागात भेटी न दिल्याने अनेक मनोरुग्णांचा उपचार अर्ध्यातच खुंटला आहे.
राज्यात शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या व नैराश्यात गेलेल्या युवकांसाठी गत काही वर्षांपासून आरोग्य विभागांतर्गत प्रेरणा प्रकल्प सुरू आहे. या अंतर्गत नैराश्यात गेलेल्या व्यक्तींना समुपदेशन केले जाते. शिवाय, मानसिक आजाराचे निदान झाल्यास, त्या रुग्णांवर उपचार केला जातो. मार्च महिन्यापर्यंत प्रकल्पांतर्गत रुग्णाची नियमित तपासणी व समुपदेशन केले जात होते; मात्र जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर आरोग्य यंत्रणेने कोविड रुग्णांकडे लक्ष केंद्रित केले. दरम्यानच्या काळात लॉकडाऊन असल्याने ग्रामीण भागातील कॅम्पदेखील बंद झाले. त्यामुळे समुपदेशन शक्य झाले नाही. तर दुसरीकडे ज्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत, त्यांनाही नियमित उपचार मिळत नसल्याचे चित्र आहे. उपचार अर्ध्यातच बंद झाल्याने अनेकांच्या समस्या वाढल्या आहेत; मात्र याकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
उपचारासाठी डॉक्टरच नाही
प्रेरणा प्रकल्पांतर्गत मनोरुग्णांवर उपचारासाठी स्वतंत्र डॉक्टरांची व्यवस्था होती; मात्र लॉकडाऊनच्या काळात प्रकल्पांतर्गत कार्यरत डॉक्टरांनी येथील रुग्णसेवा बंद केली. रिक्त जागी नव्याने डॉक्टर उपलब्ध न झाल्याने रुग्णसेवा खोळंबली आहे.
रुग्णांच्या प्रकृतीवर परिणाम
प्रेरणा प्रकल्पांतर्गत मानसिक आजारी रुग्णांवर उपचार सुरू असल्याने त्यांच्यात सुधारणा झाली होती; मात्र कोरोनामुळे गत चार ते पाच महिन्यांपासून रुग्णांवर उपचार बंद आहेत. त्यामुळे सुधारणा झालेल्या रुग्णांच्याही प्रकृतीवर परिणाम होताना दिसून येत आहेत.