Corona Vaccine : अकोल्यासाठी कोव्हॅक्सिनचे केवळ २४०० डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 10:48 IST2021-05-16T10:45:50+5:302021-05-16T10:48:23+5:30
Covaxin in Akola : शनिवारी २४०० डोसचा पुरवठा झाल्याने काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

Corona Vaccine : अकोल्यासाठी कोव्हॅक्सिनचे केवळ २४०० डोस
अकोला : जिल्ह्यात कोव्हॅक्सिन लसीची कमी भासत असताना शनिवारी २४०० डोसचा पुरवठा झाल्याने काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. अकोल्यासह विभागातील पाचही जिल्ह्यांसाठी कोव्हॅक्सिन लसीचे २० हजार ४८० डोस उपलब्ध झाले. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाल्याने कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोससाठी अनेकांना कसरत करावी लागणार आहे. मध्यंतरी १८ ते ४५ वर्षे वयोगटातील लाभार्थींच्या लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर लसीचा तुटवडा भासण्यास सुरुवात झाली. त्याचा फटका ४५ वर्षांवरील वयोगटातील लाभार्थींच्या लसीकरणावर झाला. कोव्हिशिल्ड सहज मिळत असली, तरी कोव्हॅक्सिनचा पुरवठा जवळपास ठप्प झाला होता. त्यामुळे ज्यांनी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला, अशांना दुसऱ्या डोससाठी प्रतीक्षा करावी लागली. दोन्ही डोसमधील आवश्यक अंतरापेक्षा जास्त काळ उलटूनही अनेक लाभार्थींना दुसरा डोस मिळणे कठीण झाले. दरम्यान, ४५ वर्षांआतील लाभार्थींचे लसीकरण थांबविण्यात आले. त्यामुळे ४५ वर्षांवरील लाभार्थींना कोव्हॅक्सिन मिळू लागली, मात्र त्यासाठी अर्धी रात्र केंद्राबाहेर काढावी लागली. लसीचा तुटवडा भासत असताना शनिवारी जिल्ह्यासाठी कोव्हॅक्सिनचे आणखी २४०० डोस उपलब्ध झाले, मात्र लसीचा हा साठा पर्याप्त नसल्याने आणखी काही दिवस कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोससाठी नागरिकांना कळ सोसावी लागणार आहे.
जिल्हानिहाय कोव्हॅक्सिनचे वाटप
जिल्हा - डोस
अकोला - २४००
अमरावती - ४८००
बुलडाणा - ४३००
वाशिम - ५६००
यवतमाळ - ३३८०
------------------
एकूण - २०,४८०