अकोल्यातील खासगी लॅबकडून विनापरवानगी सुरू होती कोरोना चाचणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 19:03 IST2020-10-19T19:01:21+5:302020-10-19T19:03:34+5:30
Akola Lab corona test लॅबचे संचालक डॉ. राम मंत्रीसह ठाणे येथील प्रवीण शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

अकोल्यातील खासगी लॅबकडून विनापरवानगी सुरू होती कोरोना चाचणी!
अकोला: कोरोना चाचणी तसेच स्वॅब संकलनासाठी केंद्र किंवा राज्य सरकारसोबतच आयसीएमआरची परवानगी आवश्यक असते; मात्र अकोल्यातील मंत्री लॅबकडून कुठलीच शासकीय परवानगी न घेता संदिग्ध रुग्णांचे स्वॅब संकलित करून ते ठाणे येथील इंफेक्शन लेबॉरेटरीजमध्ये पाठविण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सिव्हिल लाइन्स पोलिसांकडून मंत्री लॅबचे संचालक डॉ. राम मंत्रीसह ठाणे येथील प्रवीण शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचे डॉ. राजेश पवार यांच्या तक्रारीनुसार, सिव्हिल लाइन स्थित अमनखा प्लॉट परिसरात डॉ. राम मंत्री यांचे मंत्री लेबॉरेटरी आहे. या लॅबला आयसीएमआरची परवानगी नसतानाही डॉ. मंत्री हे त्यांच्या लॅबमध्ये कोरोना चाचणीसाठी संदिग्ध रुग्णांचे स्वॅब संकलित करत होते. संकलित स्वॅब तपासणीसाठी ठाणे येथील इंफेक्शन लेबॉरेटरीज येथे पाठवित. आयसीएमआरची परवानगी नसताना कोरोना चाचणीचा हा प्रकार सुरू असल्याचे लक्षात येताच जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयासोबतच महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मंत्री लॅबची झाडाझडती घेण्यात आल्याची माहिती आहे. याप्रकरणी मंत्री लॅबचे डॉ. राम मंत्री आणि ठाणे येथील इंफेक्शन लॅबचे वरिष्ठ व्यवस्थापक प्रवीण शिंदे यांच्याविरुद्ध सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात कलम १९९, २६९, ४२० तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कलम ५१ (बी), संसर्गरोग नियंत्रण कलम ३ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.