तरुणांमुळेच मुले, ज्येष्ठांमध्ये वाढतोय कोरोना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 10:53 AM2021-04-15T10:53:51+5:302021-04-15T10:54:08+5:30

CoronaVirus in Children: अनेकदा घराबाहेर पडणारे तरुण हेच याला कारणीभूत ठरत असल्याचेही दिसून आले आहे.

Corona is growing among children and seniors due to youth | तरुणांमुळेच मुले, ज्येष्ठांमध्ये वाढतोय कोरोना

तरुणांमुळेच मुले, ज्येष्ठांमध्ये वाढतोय कोरोना

Next

अकोला : गत दोन महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला असून, अनेक जण घराबाहेर न पडताही पॉझिटिव्ह आल्याचे निदर्शनास आले आहेत. अनेकदा घराबाहेर पडणारे तरुण हेच याला कारणीभूत ठरत असल्याचेही दिसून आले आहे. त्यामुळे तरुणांनो बाहेरून घरात प्रवेश केल्यावर लहान मुले व ज्येष्ठांच्या थेट संपर्कात येणे टाळावे, तसेच नियमित मास्क लावणे, इतरांपासून सुरक्षित अंतर ठेवणे तसेच वारंवार साबणाने हात स्वच्छ धुणे या त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहे. जिल्ह्यात कोविड पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये लहान मुलांचे प्रमाण कमी असले, तरी वयोवृद्धांचे प्रमाण सर्वाधिक आहे. हे दोन्ही घटक क्वचितच घराबाहेर पडत असून, इतरांच्या संपर्कात कमी येतात, मात्र कुटुंबातील तरुण वर्ग नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणास्तव घराबाहेर पडत असतो. स्वभावाने चंचल वृत्ती असल्याने तरुणाई अनेकांच्या संपर्कात येते. बाहेरून घरात आल्यानंतर तरुण वर्ग कळत नकळत कुटुंबीयांच्या संपर्कात येतो. त्यामुळे त्यांच्यापासून कुटुंबातील इतर सदस्यांना विशेषत: वयोवृद्धांना कोविड संसर्गाचा धोका जास्त असतो. त्यामुळे या घटकातील व्यक्तींनी बाहेरून घरात प्रवेश करताना विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे.

बाहेरून घरी आल्यानंतर ही घ्या काळजी

बाहेर जाताना मास्क लावणे, इतरांपासून सुरक्षित अंतर ठेवणे आदी नियमांचे पालन केले जाते, मात्र बाहेरून घरी परतल्यावर अनेकांकडून बेफिकिरी होते. ही बेफिकिरी टाळून प्रत्येकाने घरात प्रवेश करताच साबणाने स्वच्छ हात, पाय चेहरा धुऊन घ्यावा. त्यानंतरही घरात मास्कचा वापर करावा. इतरांपासून विशेषत: कुटुंबातील लहान मुले व ज्येष्ठांपासून सुरक्षित अंतर ठेवूनच राहावे. तसेच शिंकताना, खोकताना नाकातोंडावर रुमाल ठेवावा. घरात असाल, तरी वारंवार हात स्वच्छ धुवावे.

 

ही पहा उदाहरणे

१) सिंधी कॅम्प परिसरातील एक ७५ वर्षीय वयोवृद्ध महिला स्वत: आजारी असल्याने घराबाहेर पडत नव्हती, मात्र त्यांच्या कुटुंबातील तरुण वर्ग नेहमीच कामानिमित्त घराबाहेर पडतात. घर लहान असल्याने बाहेरून घरात आल्यावर तरुणांचा थेट वयोवृद्ध महिलेशी संपर्क येत असल्याने त्या कोविड पॉझिटिव्ह आल्या होत्या.

 

२) जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर जठारपेठ भागातील एका वयोवृद्ध दाम्पत्याने घराबाहेर निघणे टाळले. त्यामुळे ते कोरोनापासून सुरक्षित झाले, मात्र घरातील तरुणाईच्या बेफिकिरीमुळे बाहेरील कोरोना घरात शिरला. तरुणांच्या संपर्कात आल्याने कुटुंबातील वयोवृद्धही पॉझिटिव्ह आल्याचे निदर्शनास आले आहे.

 

नागरिकांनी घराबाहेरच नाही, तर घरातही आवश्यक नियमांचे पालन करण्याची गरज आहे. बाहेरून घरात प्रवेश केल्यानंतर नागरिकांनी हात स्वच्छ धुवावे. कुटुंबातील ज्येष्ठांसह लहान मुलांच्या थेट संपर्कात येणे टाळावे. तरच घरात सुरक्षित असलेले वयोवृद्ध व्यक्ती कोरोनापासून सुरक्षित राहतील. त्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येकाने त्रिसूत्रीचे पालन करावे.

- डॉ. राजकुमार चव्हाण, प्र. आरोग्य उपसंचालक, अकोला

Web Title: Corona is growing among children and seniors due to youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.