कोरोना रुग्णावर उपचारात दिरंगाई केल्याचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:18 IST2021-04-21T04:18:58+5:302021-04-21T04:18:58+5:30
नातेवाइकांची रामदासपेठ पोलीस ठाण्यात तक्रार अकोला : शहरातील एका खासगी रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णास दाखल केल्यानंतर रुग्णाची प्रकृती खालावल्याने ...

कोरोना रुग्णावर उपचारात दिरंगाई केल्याचा आरोप
नातेवाइकांची रामदासपेठ पोलीस ठाण्यात तक्रार
अकोला : शहरातील एका खासगी रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णास दाखल केल्यानंतर रुग्णाची प्रकृती खालावल्याने एका मोठ्या खासगी हॉस्पिटलमध्ये मंगळवारी दुपारी हलविण्यात आले; मात्र रुग्णालयात उपचार सुरू करण्यापूर्वीच रुग्णाचा मृत्यू झाल्याने प्रशासनाने दिरंगाई केल्याचा आरोप करीत नातेवाइकांनी रामदासपेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
शहरातील डॉक्टर अग्रवाल यांच्या रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णास उपचारासाठी दाखल करण्यात आले होते; मात्र या रुग्णाची प्रकृती खालावल्याने डॉक्टर अग्रवाल यांनी रुग्णास आयकॉन हॉस्पिटल येथे हलविण्याचे सांगितले. त्यानंतर रुग्णाचे नातेवाईक रुग्णास घेऊन आयकॉन हॉस्पिटल परिसरात पोहोचले; मात्र प्रशासनाने रुग्णास दाखल करून घेण्यास दिरंगाई केल्याने तेवढ्यात रुग्णाचा मृत्यू झाला. उपचार करण्यास वेळ गमावल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत नातेवाइकांनी या प्रकरणाची तक्रार रामदासपेठ पोलीस ठाण्यात केली आहे. रामदासपेठ पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे; मात्र रुग्णालयाबाहेर मृत्यू झाल्याने पोलीसही या प्रकरणात काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे. यासंदर्भात हॉस्पिटल प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यांनी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच रुग्णास आतमध्ये प्रवेश देण्यात येतो; मात्र ही प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच रुग्णाचा बाहेरच मृत्यू झाल्याने या संदर्भात काहीही बोलण्यास नकार दिला आहे.