मराठीच्या अभ्यासक्रमांचे सुसूत्रीकरण करा!
By Admin | Updated: January 11, 2015 01:08 IST2015-01-11T01:08:17+5:302015-01-11T01:08:17+5:30
लोकमतला दिलेल्या मुलाखतीत मराठी भाषातज्ज्ञ यु.म.पठाण यांचे आवाहन.
_ns.jpg)
मराठीच्या अभ्यासक्रमांचे सुसूत्रीकरण करा!
डॉ. किरण वाघमारे /अकोला
अकोला : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू, पद्मश्री डॉ.यु.म पठाण मराठी भाषेचे अभ्यासक म्हणून सुपरिचित आहेत. संत साहित्याचा त्यांचा चांगला व्यासंग आहे. महानुभाव, वारकरी सोबतच सुफी आणि मुस्लीम संतकवींना आपल्या लेखणीतून पठाण यांनी जनमाणसात पोहोचविले आहे. भाषातज्ज्ञ म्हणूनदेखील त्यांची ख्याती आहे. शेकडो पुस्तके त्यांच्या नावावर असून, राज्य शासनासह केंद्र शासनाचे तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कार पठाण यांना मिळाले आहेत.
देश-विदेशात त्यांनी आपल्या व्याख्यानातून संत साहित्याचा प्रचार आणि प्रसार केला आहे. वयाच्या ८५ व्या वर्षीदेखील एखाद्या व्रतस्थाप्रमाणे संत साहित्याच्या प्रचारासाठी त्यांची धडपड सुरू आहे. एका कार्यक्रमानिमित्ताने पठाण अकोल्यात आले असता त्यांनी लोकमतशी बोलताना मराठी भाषेविषयीची आपली तळमळ व्यक्त केली.
प्रश्न: मराठी भाषेच्या आजच्या परिस्थितीबद्दल आपण समाधानी आाहात का?
मुळात मराठी भाषेकडे आपण गांभीर्याने बघतो आहे का, ही महत्त्वाची बाब आहे. मराठी भाषेच्या अस्तित्वाबद्दल आपण पोटतिडकीने बोलतो; परंतु तितक्याच पोटतिडकीने आपण मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करतो का, यावर चिंतन होणे गरजेचे आहे.
प्रश्न: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न होत आहेत का, आपले मत काय?
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यात कोणाचेच दुमत नाही; परंतु केंद्र शासनाच्या जाचक अटी पूर्ण केल्या म्हणजे मराठी भाषा अभिजात होईल, हे मला मान्य नाही. मुळात मराठी भाषेत लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, तुकारामगाथा यासारखे अभिजात ग्रंथ आहेत. त्यामुळे मराठी भाषा ही पूर्वीपासूनच अभिजात आहे.
प्रश्न: विद्यापीठांमध्ये मराठी भाषेचे काय स्थान आहे?
विद्यापीठ स्तरावर मराठी भाषा शिकविली जाते; परंतु प्रत्येक विद्यापीठात वेगळा अभ्यासक्रम आहे. मराठी भाषेच्या अभ्यासक्रमात सुसूत्रता असणे गरजेचे आहे. यासाठी सर्व मराठीच्या प्राध्यापकांनी व भाषातज्ज्ञांनी एकत्र बसून अभ्यासक्रम निश्चित करावा.
प्रश्न: सध्या आपले कुठले लिखाण सुरू आहे?
मराठीतील पहिला व्युत्त्पत्ती कोश मराठी-फारशी लिहून झाला, तो शासनाकडे दिला आहे. यात मराठीने स्वीकारलेल्या अरबी, फारशी आणि तुर्की शब्दांचा परिचय होणार आहे. महानुभाव साहित्य शोध समीक्षा या ग्रंथाचे काम झाले आहे. संत साहित्य नवचिंतन, महाराष्ट्रातील संत परंपरा, जडणघडण,सुफी-मुस्लीम संत कवी, स्मृतिस्थळ- मराठवाडी ही पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. आता प्रवासवर्णनासह काही शिक्षणविषयक लेखांचे संकलन असणारे पुस्तक लिहिणे सुरू आहे.
प्रश्न: संतपीठाचे काम कसे सुरू आहे ?
संतपीठाची स्थापना संत साहित्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा, यादृष्टीने झाली. पैठण येथे संतपीठाची मुहूर्तमेढ रोवल्या गेली; परंतु शासनाने जितक्या दमदारपणे संतपीठाचा पाया घातला, तेवढय़ाच उदासीनतेने याकडे दुर्लक्ष केले आहे. कर्मचारी नाहीत शिवाय कुठलेही काम होत नसल्यामुळे मी संतपीठाचा राजीनामा दिला आहे.
प्रश्न: मराठी विद्यापीठाबद्दल आपल्याला काय वाटते ?
मराठी विद्यापीठाचा प्रश्न शासन दरबारी रेंगाळला आहे. मराठी विद्यापीठाच्या आधी विद्यापीठांमधील मराठी विभाग सरळ करणे आवश्यक आहे. जी अध्यासने अस्तित्वात आहेत, त्यांची काय परिस्थिती आहे, याचा विचार केला जाणे गरजेचे आहे.
प्रश्न: घुमान येथे होणार्या आगामी मराठी साहित्य संमेलनाबद्दल आपली भूमिका काय?
भाषेचा उत्सव म्हणून साहित्य संमेलन होणे चांगली बाब आहे. घुमान ही नामदेवांची कर्मभूमी आहे. अशोक कामत यांनी घुमानची ओळख मराठी माणसाला करून दिली. घुमानच्या रस्त्यावर जाताना मोरेंना कामतांना विचारूनच पुढे जावे लागणार आहे.
प्रश्न : मराठी भाषेच्या व्याकरणात काही फेरबदल करण्याचे धोरण शासनाचे आहे?
मराठी भाषेचे व्याकरण मुळातच दज्रेदार आहे; परंतु काळाला सुसंगत बदल हवे असतील तर ते करण्यास हरकत नाही. हे फेरबदल करताना भाषतज्ज्ञांना विचारात घेतले पाहिजे, त्यांच्या अनुभवाचा लाभ घेतला गेला पाहिजे.