शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
By आशीष गावंडे | Updated: May 23, 2025 20:38 IST2025-05-23T20:31:26+5:302025-05-23T20:38:03+5:30
अकोला येथे तिरंगा रॅलीच्या आढावा बैठकीत शिवसैनिकांनी गोपीकिशन बाजोरिया यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
- आशिष गावंडे,अकोला
शिंदेंच्या शिवसेनेत दोन जिल्हाप्रमुखांच्या नियुक्तीचा वाद चव्हाट्यावर आला आहे. २३ मे रोजी जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर, अश्विन नवले यांनी तिरंगा रॅलीसाठी आयोजित केलेल्या आढावा बैठकीत हायव्होल्टेज ड्रामा पाहण्यास मिळाला. शिंदेसेनेचे जिल्हा संपर्क नेते माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांना पदावरून हटविण्याची मागणी शिवसैनिकांनी केली. इथपर्यंत न थांबता शिवसैनिकांनी शहरातील प्रमुख चौकांमध्ये बाजोरीया यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेचे बॅनर जाळून घोषणाबाजी केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
शिंदेसेनेचे जिल्हा संपर्क नेते, माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी २० मे रोजी मुंबई येथे बाळापुर विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे माजी आमदार नारायणराव गव्हाणकर तसेच जिल्हा परिषदेचे माजी सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी यांच्याकडे जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात मोलाची भूमिका बजावली. यामध्ये जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर तसेच अश्विन नवले यांच्याकडील विधानसभा मतदारसंघ कमी करण्यात आल्याने त्याचे पडसाद आजच्या आढावा बैठकीत दिसून आले.
तिरंगा रॅलीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या बैठकीत जिल्हा कार्यकारणी तसेच शहर कार्यकारणीतील असंख्य पुरुष व महिला शिवसैनिकांनी ‘‘बाजोरिया हटाव, पक्ष बचाव’’ अशी नारेबाजी केली. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.
स्थानिक नेत्यांकडून पदाधिकाऱ्यांची दिशाभूल करुन गैरसमज पसरविल्या जात असल्याचा आरोप काही पदाधिकाऱ्यांनी केला. तसेच पक्षातील माजी नगरसेवकांविरोधात अॅट्रॉसिटी दाखल करण्यातही नेत्यांनी प्रमुख भूमिका बजावल्याचे शशी चोपडे यांनी सांगितले.
यावेळी व्यासपीठावर जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर, अश्विन नवले, जिल्हा समन्वयक गजाननराव पावसाळे, बादलसिंह ठाकुर, महानगरप्रमुख योगेश अग्रवाल, शहर प्रमुख रमेश गायकवाड, पप्पू मोरवाल यासह अनेक प्रमुख पदाधिकारी,माजी नगरसेवक उपस्थित होते.
पुतळा जाळून व्यक्त केला निषेध
जिल्हा परिषदेच्या कर्मचारी भवनमधील बैठक आटोपताच काही शिवसैनिकांनी शहरातील धिंग्रा चौक, नेहरु पार्क चौकासह इतर काही ठिकाणी शिंदेसेनेचे संपर्क नेते गोपीकिशन बाजोरिया यांचे प्रतिकात्मक बॅनर जाळले. त्यावेळी बाजोरिया यांच्याविरोधात नारेबाजी करण्यात आली.
भाजपमधील पदाधिकाऱ्यांना खिरापत
मागील अनेक वर्षांपासून शिवसेनेत खस्ता खाल्लेल्या निष्ठावान शिवसैनिकांना उपेक्षित ठेवल्या जात असल्याची भावना बैठकीत पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली. शिवभोजन केंद्राचा लाभ मर्जितील पदाधिकाऱ्यांना देण्यात आले. भाजपमधून आलेल्यांना पदांची खिरापत वाटली जात असल्याचा मुद्दा बैठकीत पदाधिकाऱ्यांनी मांडला.