लाच घेताना कंत्राटी कार्यकारी अभियंता गजाआड

By Admin | Updated: December 24, 2014 00:08 IST2014-12-24T00:08:47+5:302014-12-24T00:08:47+5:30

अकोला येथील घटना; देयकाचे नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी स्वीकारले सहा हजार रुपये.

Contracting Executive Engineer GajaAud, while taking bribe | लाच घेताना कंत्राटी कार्यकारी अभियंता गजाआड

लाच घेताना कंत्राटी कार्यकारी अभियंता गजाआड

अकोला: १७ हजार रुपयांच्या देयकासाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी सहा हजार रुपये लाच घेणारा सर्व शिक्षा अभियानचा कंत्राटी कार्यकारी अभियंता गजानन संपत चिपडे याला मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी रेल्वे स्टेशन चौकातील एका हॉटेलमधून अटक केली. चिपडे याला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
अर्जदाराच्या तक्रारीनुसार, सर्व शिक्षा अभियानांतर्गत २0११ व २0१२ मध्ये बिहाडमाथा (ता. बार्शिटाकळी) येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत एक वर्गखोली बांधण्यात आली होती. त्यासाठी ३ लाख ८४ हजार रुपये अनुदान मंजूर करण्यात आले होते. त्यापैकी तक्रारदाराला ३ लाख ६७ लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले. उर्वरित १७ हजार रुपयांची रक्कम मिळाली नव्हती. ही रक्कम मिळण्यासाठी तक्रारदाराने सर्व शिक्षा अभियानातील कंत्राटी कार्यकारी अभियंता गजानन चिपडे यांच्याकडे देयक सादर केले. या देयकासाठी चिपडे यांच्या नाहरकत प्रमाणपत्राची गरज होती. हे नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी त्यांनी तक्रारदाराला सात हजार रुपयेलाचेची मागणी केली.
दरम्यान, तक्रारकर्त्याने सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी रेल्वे स्टेशन चौकातील एका हॉटेलमध्ये सापळा रचला. या ठिकाणी चिपडे हा आला आणि त्याने तक्रारकर्त्याकडून सहा हजार रुपयांची लाच स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पोलीस अधिकार्‍यांनी त्याला रंगेहाथ अटक केली. आरोपीवर रामदासपेठ पोलीस ठाण्यात कलम ७, १३(१),(ड) सह १३(२) लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Contracting Executive Engineer GajaAud, while taking bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.