दिलासा: तेल्हारा तालुक्यात १८८३ रुग्णांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:17 IST2021-05-15T04:17:49+5:302021-05-15T04:17:49+5:30
प्रशांत विखे तेल्हारा: कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढला असून, दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत ...

दिलासा: तेल्हारा तालुक्यात १८८३ रुग्णांची कोरोनावर मात
प्रशांत विखे
तेल्हारा: कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढला असून, दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. असे असले तरी तालुक्याचा मृत्यूदर हा एक टक्क्यापेक्षा कमी आहे. तालुक्याचा पॉझिटिव्हिटी रेट १४.१ टक्के असला तरी तालुक्यातील तब्बल १८८३ रुग्णांनी कोरोनावर मात केल आहे.
तालुक्यात दुसऱ्या लाटेत तब्बल १७ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ग्रामीण भागातील १३ व शहरातील ४ रुग्णांचा समावेश असल्याची माहिती आहे. कोरोनाच्या दुसरी लाटेत आतापर्यंत तालुक्यातील १६ हजार ६१५ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी २,३२९ जणांचा अहवाल हा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. तालुक्यात दिलासादायक चित्र म्हणजे १,८८३ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सद्यस्थितीत तालुक्यात ४२९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात वेगाने पसरत असून, नागरिक बेफिकीर असल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी ग्रामस्तरावर निर्माण केलेले पथक गावात कोरोना बाबतीत जनजागृती करताना कमी पडत असल्याचे दिसून येते, तर त्या तुलनेत शहरी भागात नागरिकांचे प्रशासनाला सहकार्य मिळत असल्याने दर कमी आहे.
----------------------
तालुक्यात ४२९ ॲक्टिव्ह रुग्ण
तालुक्यात शहरापेक्षा ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. सद्यस्थितीत तालुक्यात ४२९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाचा रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहेत.
----------------------
वडगाव रोठे व बाभूळगाव येथे प्रत्येकी २०च्या वर कोरोनाबाधित रुग्ण आहेत. नागरिक स्वतः हून कोरोना चाचणी करण्यासाठी तयार आहेत; मात्र जिल्हा आरोग्य विभागाकडून प्राथमिक आरोग्य केंद्रला सहकार्य होत नसल्याने चाचणीपासून नागरिक वंचित आहेत. याबाबत जिल्हा स्तरावरील यंत्रणेला अवगत केले आहे.
-चंदू बोरसे, सामाजिक कार्यकर्ते, वडगाव रोठे.
-------------------
कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासन स्तरावर प्रयत्न केल्या जात असून, नागरिकांचे सहकार्य मिळत आहे. नागरिकांनी कोरोनाविषयक नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे.
- डॉ.संतोष येवलीकर, तहसीलदार ,तेल्हारा.
-----------------------------