लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महापालिका प्रशासनाने शहरातील मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन केल्यानंतर ३० ते ६० टक्क्यांपर्यंत कराच्या रकमेत वाढ केली. ही वाढ अवास्तव असून, सत्ताधारी भाजपच्या संमतीमुळेच ही करवाढ लादण्यात आल्याचा आरोप करीत सत्ताधारी व प्रशासनाने ही कर वाढ रद्द न केल्यास काँग्रेसच्या वतीने २६ मे (शुक्रवार)पासून जनआंदोलन छेडणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेता साजीद खान यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. मनपा प्रशासनाने दर चार वर्षांनी मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करून टॅक्सच्या दरात टप्प्या-टप्प्याने वाढ करणे अपेक्षित होते. तसे न करता एकाच दमात अकोलेकरांवर करवाढीचा बोजा लादला. नागरिकांना अव्वाच्या सव्वा दराने करवाढीच्या नोटिस प्राप्त होत असल्यामुळे त्यांच्यात रोष निर्माण झाल्याची माहिती मनपातील विरोधी पक्षनेता साजीद खान पठाण यांनी दिली. सत्ताधारी भाजपच्या राजवटीत नागरिकांवर लादलेली कर वाढ कदापि मान्य नसून, प्रशासनाने ही कर वाढ त्वरित मागे न घेतल्यास काँग्रेसच्या वतीने संपूर्ण शहरात जनआंदोलन उभारणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेता पठाण यांनी दिली. शहरातील विकास कामांसाठी काँग्रेसची प्रशासनाला नेहमीच साथ राहील; परंतु अवाजवी करवाढीचे काँग्रेस कदापि समर्थन करू शकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसच्या वतीने २६ मे रोजी मनपासमोर आंदोलन छेडले जाणार असून, त्यानंतर टप्प्या-टप्प्याने संपूर्ण शहरात आंदोलन उभारले जाईल. भाजपचे खासदार, पालकमंत्री, आमदार तसेच नगरसेवकांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन केले जाईल. त्यानंतरही कर वाढ मागे न घेतल्यास आंदोलन अधिक उग्र करण्याचा इशारा साजीद खान यांनी दिली. पत्रकार परिषदेला काँग्रेसचे महानगराध्यक्ष तथा माजी आ. बबनराव चौधरी, माजी आ. लक्ष्मणराव तायडे, माजी महापौर मदन भरगड, राजेश भारती, प्रकाश तायडे, नगरसेवक पराग कांबळे, इरफान खान, मोहम्मद नौशाद, महेंद्र गवई, आकाश कवडे आदी उपस्थित होते. बहुमतामुळे भाजपची दादागिरीमहापालिकेत भाजपचे बहुमत असल्यामुळे सभागृहात मनमानीरीत्या ठराव मंजूर केले जातात. या विषयावर कोणतीही चर्चा न करता सत्ताधाऱ्यांनी करवाढीला मंजुरी दिल्याची माहिती आहे. त्यापूर्वी २०१५ मध्ये पार पडलेल्या सभेत मालमत्ता कर आकारणीचा विषय आला असता, सूचक असलेले माजी नगरसेवक सुनील मेश्राम आणि अनुमोदक विजय अग्रवाल यांनी कर आकारण्यापूर्वी समितीचे गठन करण्याचा प्रस्ताव मांडला होता, अशी आठवण माजी महापौर मदन भरगड यांनी करून दिली.महासभा होऊ देणार नाही!मनपाच्या सभागृहात २९ मे रोजी सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. जोपर्यंत कर वाढ मागे घेण्याचा सभागृह निर्णय घेणार नाही, तोपर्यंत सभा सुरू होऊ देणार नसल्याचा इशारा साजीद खान यांनी दिला.
करवाढीच्या विरोधात काँग्रेसचे जनआंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2017 01:15 IST