अकोला महापौर पदासाठी काँग्रेसला पाठींबा नाही!
By Admin | Updated: September 6, 2014 02:32 IST2014-09-06T02:25:20+5:302014-09-06T02:32:59+5:30
भारिप-बमसंची भूमिका जाहीर

अकोला महापौर पदासाठी काँग्रेसला पाठींबा नाही!
अकोला : महापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला कदापि पाठींबा देणार नसल्याची भूमिका भारिप-बहुजन महासंघाने शुक्रवारी जाहीर केल्याने राजकीय पटलावर भूकंप आला आहे. भारिप-बमसंच्या सर्व नगरसेवकांनी एकमताने हा निर्णय घेतल्याची माहिती भारिपचे गटनेता गजानन गवई यांनी स्पष्ट केले. भारिपच्या धक्कातंत्रामुळे काँग्रेसचे महापौरपदाचे स्वप्न तूर्तास धुळीस मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीला अवघ्या चार दिवसांचा अवधी शिल्लक असताना, भारिप-बमसंने राजकीय वतरुळात बॉम्बगोळा फेकला. महापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेसला सहकार्य करायचे किंवा नाही, या मुद्यावर भारिप-बमसंच्या आठ नगरसेवकांची बैठक महापौर ज्योत्स्ना गवई यांच्या दालनात ५ सप्टेंबर रोजी पार पडली. यामध्ये काँग्रेस आघाडीने अडीच वर्षांच्या कालावधीत भारिप-बमसंला कधीही सहकार्य केले नसल्याने विकासाचे अनेक मुद्दे प्रलंबित असल्याचा आरोप बैठकीत करण्यात आल्याची माहिती आहे. सभागृहात शहर हिताचे निर्णय घेताना खुद्द सत्तापक्ष काँग्रेसनेच विरोध केल्याने विरोधकांचे आपोआपच फावले. खापर मात्र भारिपच्या नगरसेवकांवर फोडण्यात आले. परिणामी नागरिकांचा रोष भारिपच्या नगरसेवकांना सहन करावा लागला. अशास्थितीत महापौर पदासाठी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला पाठींबा देणे शक्य नसल्यावर एकमत करण्यात आले. पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी एकमताने घेतलेला निर्णय भारिपचे गटनेता गजानन गवई यांनी जाहीर केल्याने काँग्रेसच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. भारिपच्या भूमिकेमुळे राजकीय समीकरणांमध्ये मोठय़ा प्रमाणावर उलटफेर होण्याचे संकेत आहेत. यादरम्यान, काँग्रेसमधील काही इच्छूक उमेदवारांनी भारिपची मनधरणी सुरू केल्याची माहिती आहे.