रासायनिक खतांच्या अशास्त्रीय वापरावर चिंता!

By Admin | Updated: November 4, 2015 02:59 IST2015-11-04T02:59:22+5:302015-11-04T02:59:22+5:30

अकोला येथील राज्यस्तरीय परिसंवादात उपयोजनेवर भर देण्याचा सूर.

Concerns on the use of chemical fertilizers. | रासायनिक खतांच्या अशास्त्रीय वापरावर चिंता!

रासायनिक खतांच्या अशास्त्रीय वापरावर चिंता!

अकोला : पिकांमध्ये रासायनिक खतांचा वापर अर्मयाद वाढला असून, त्याचे प्रतिकूल परिणाम सर्वच पातळ्यांवर दिसत असल्याने रासायनिक खतांच्या अशास्त्रीय वापरावर र्मयादा घालण्यासाठी व यासंबधी विषयावर दोन दिवस अकोल्यात मंथन झाले. यात देशासह या राज्यातील जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण आणखी घसरत चालल्याचे सातत्याने चिंताजनक निष्कर्ष समोर येत असून, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीनुसार जमिनीचे आरोग्य सुधारण्यावर पर्यायी उपाययोजना करण्यासंदर्भात देशभरातील कृषी रसायन शास्त्रज्ञांनी निष्कर्ष काढले. या तांत्रिक सत्रात झालेल्या चर्चेच्या आधारावर निश्‍चित धोरण ठरवले जाणार आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मृद् विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागाने आंतरराष्ट्रीय मृदा वर्षाचे औचित्य साधून ह्यमृद् व जल गुणवत्ताह्ण या विषयावर २ व ३ नोव्हेंबर असे दोन दिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादाचा मंगळवारी समारोप झाला. दोन दिवसांत चार तांत्रिक सत्र पार पडले. प्रथम तांत्रिक सत्रात जमिनीची गुणवत्ता, अन्नद्रव्ये व संवर्धन या विषयावर शास्त्रज्ञांनी चर्चा केली. या चर्चेत भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व भूमी उपयोग अन्वेषणचे संचालक डॉ. एस.के. सिंग, राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मृद् विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. अशोक फरांदे आणि भारतीय मृद् विज्ञान संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. विश्‍वकर्मा यांनी सहभाग घेतला. या सत्रात या विषयावर चर्चा पार पडली. दुसरे सत्र भारतीय मृदा विज्ञान संस्थेचे अध्यक्ष डॉ. जगदीश प्रसाद (नवी दिल्ली) यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले. या सत्रात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या मृद् विज्ञान विभागप्रमुख डॉ. व्ही.डी. पाटील, डॉ. पंदेकृविचे कृषी अधिष्ठाता डॉ. व्ही.एम. भाले, केंद्रीय मृदा लवणता संशोधन संस्थेचे प्रमुख डॉ. अनिल चिंचमलातपुरे, राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्थानचे शास्त्रज्ञ डॉ. जी.के. खडसे, खासगी कंपनीचे डॉ. शशिकांत भेंडे यांनी सहभाग घेऊन विचार मांडले. या दोन्ही सत्रांमध्ये सादरीकरण करणार्‍या शास्त्रज्ञांनी रासायनिक खतांचा अशास्त्रीय वापर, जमिनीची होणारी प्रचंड धूप, संवर्धित शेतीसाठीच्या विविध पद्धती, अतिरिक्त सिंचनाद्वारे पाण्याचा वापर, सांडपाण्याचे गुणधर्म, कोरडवाहू जमिनीमध्ये उत्पादन व मातीची गुणवत्ता राखण्यासाठी आवश्यक असलेले तंत्रज्ञान आदी विषयांवर प्रदीर्घ चर्चा करण्यात आली. तांत्रिक चर्चासत्राचे संचालन कृषी रसायन शास्त्रज्ञ डॉ. नितीन कोंडे यांनी केले. याप्रसंगी १३६ भित्तिपत्रकांचे सादरीकरण करण्यात आले.

Web Title: Concerns on the use of chemical fertilizers.