Concerns of senior citizens also increased! | ज्येष्ठ नागरिकांची काळजी अन् घुसमटही वाढली!

ज्येष्ठ नागरिकांची काळजी अन् घुसमटही वाढली!

अकोला : कोरोनामुळे मार्च महिन्यापासून लॉकडाऊन सुरू झाले, तेव्हापासून ज्येष्ठ नागरिकांना घरात बंदिस्त व्हावे लागले. कोरोनासोबतच जगायची मानसिकता ठेवून आता सारेच कामाला लागले आहेत. सरकारही अनलॉकच्या प्रक्रि येत हळूहळू बंधने शिथिल करत आहे. विद्यार्थ्यांच्या आॅनलाइन शाळाही सुरू आहेत. अपवाद केवळ ज्येष्ठ नागरिकांचा आहे. कोरोनामुळे ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर पडण्यास निर्बंध आहेत. बाहेर निघाल्यास कोरोनाची भीती अन् घरात राहून प्रतिकारशक्ती कमी होणार नाही, याची काळजी घेण्याची चिंता या सर्व प्रकारात ज्येष्ठांची घुसमट वाढत आहे.
कोरोनापूर्वी मैदान, बाग, ज्येष्ठ नागरिक संघ, विरंगुळा केंद्रात सगळे एकत्र जमायचे, मोकळ्या वातावरणात गप्पा मारायचे, त्यामुळे मन मोकळे व्हायचे. एकमेकांची आस्थेने विचारपूस, सुख,दु:ख वाटून घेत होते. शरीराबरोबर मानसिक स्वास्थ्यही जपले जायचे. आता सगळेच बंद झाले आहे. अनलॉकमुळे काही प्रमाणात सकाळी संध्याकाळचे फिरणे सुरू झाले असले, तरी शारीरिक अंतर पाळत कुणाचाही संसर्ग होणार नाही, याची काळजी घेण्याची चिंता कायमच आहे.
वाचन, लेखन, आवडीचे छंद यांसारख्या गोष्टीही वारंवार करून कंटाळा आला आहे. काही कुटुंबांमध्ये ज्येष्ठांची काळजी घेतली जात असली तरी काहींमध्ये भांडणतंटेही होत आहेत. अकोल्यातील उमरी परिसरातील एका भांडणात तर थेट उपविभागीय अधिकाऱ्यांना अधिकाराचा वापर करून ज्येष्ठांच्या अधिकाराचे संरक्षण करावे लागले. त्यामुळे काही कुटुंबातील कलहामुळेही अनेकांना बाहेर पडायचे आहे; मात्र कोरोनाच्या भीतीमुळे त्यांना बाहेर पडता येत नाही. केवळ रुग्णालयात जाण्यासाठीच ते बाहेर पडत आहेत; मात्र यावेळीही त्यांच्या मनात कोरोनाची भीती कायमच आहे.
 
मोबाइलचा वापर वाढला!
काही ज्येष्ठांनी अँड्रॉइड मोबाइल वापरण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. ज्येष्ठ नागरिक संघानेही व्हॉटसअ‍ॅप ग्रुप तयार करून आपल्या सदस्यांना सूचना देण्याचा, संवाद कायम ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.


दूरचित्रवाणीचा आधार
दूरचित्रवाणी हे विरंगुळ्याचे चांगले साधन ज्येष्ठांसाठी ठरत असले तरी डोळ्याच्या आजारांमुळे दूरचित्रवाणी पाहाण्यावरही बंधने येतात.

 

Web Title: Concerns of senior citizens also increased!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.