शिष्यवृत्तीसाठी आधारकार्डची सक्ती शिथिल

By Admin | Updated: September 4, 2015 01:10 IST2015-09-04T01:10:59+5:302015-09-04T01:10:59+5:30

महाविद्यालयांकडून आधार कार्डची मागणी

The compulsions of Aadhaar card for scholarship loosened | शिष्यवृत्तीसाठी आधारकार्डची सक्ती शिथिल

शिष्यवृत्तीसाठी आधारकार्डची सक्ती शिथिल

अकोला : भारत सरकारद्वारा देण्यात येणार्‍या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण फी योजनेच्या नोंदणीसाठी आधार कार्डची सक्ती शिथिल करण्यात आली आहे. परंतु, महाविद्यालयांमार्फत शिष्यवृत्ती अर्ज स्वीकृती वेळेस आधार कार्डची मागणी करण्यात येत असल्याने विद्यार्थी पेचात पडले आहेत. भारत सरकारद्वारा दरवर्षी अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती देण्यात येते. इयत्ता ११ वी मध्ये नव्याने प्रवेश घेणारे तसेच पहिल्यांदाच शिष्यवृत्ती घेणार्‍या पात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करून शिष्यवृत्ती अर्ज मागविण्यात येतात. ऑनलाइन पद्धतीने केलेल्या अर्जाची प्रत इतर दस्तऐवजांसह महाविद्यालयात सादर करणे बंधनकारक आहे. परंतु, यंदाच्या नवीन शैक्षणिक सत्रापासून आधार कार्डची सक्ती शिथिल करण्यात आल्याने ऑनलाइन शिष्यवृत्तीसाठी नोंदणी करताना आधार कार्ड क्रमांकाची आवश्यकता नाही. असे असले तरी, महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या संकेतस्थळावर शिष्यवृत्तीसाठी आवश्यक दस्तऐवजाच्या यादीत आधार कार्ड अनिवार्य दाखविण्यात आले आहे. परिणामी ऑनलाईन अर्जाची प्रत महाविद्यालयात सादर करताना महाविद्यालयांकडून आधार कार्डची मागणी होत आहे. एकीकडे आधार कार्डची सक्ती शिथिल करण्यात आली आहे, तर दुसरीकडे महाविद्यालयात मागणी होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण होत आहे.

Web Title: The compulsions of Aadhaar card for scholarship loosened