कर्जमाफीचे ‘ऑनलाइन’ अर्ज भरण्याचे काम पूर्ण करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 01:06 IST2017-08-25T01:05:59+5:302017-08-25T01:06:34+5:30
कर्जमाफी योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकर्यांकडून ‘ऑनलाइन’ अर्ज भरून घेण्याचे काम सुरू आहे. कर्जमाफीचे ‘ऑनलाइन’ अर्ज भरण्याचे काम येत्या १५ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे जिल्हाधिकार्यांना दिला.

कर्जमाफीचे ‘ऑनलाइन’ अर्ज भरण्याचे काम पूर्ण करा!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: कर्जमाफी योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकर्यांकडून ‘ऑनलाइन’ अर्ज भरून घेण्याचे काम सुरू आहे. कर्जमाफीचे ‘ऑनलाइन’ अर्ज भरण्याचे काम येत्या १५ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे जिल्हाधिकार्यांना दिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जिल्हाधिकार्यांची ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’ घेतली. त्यामध्ये कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीसह इतर विषयांची जिल्हानिहाय माहिती संबंधित जिल्हाधिकार्यांकडून मुख्यमंत्र्यांनी घेतली. राज्य शासनामार्फत छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत ३0 जून २0१६ पर्यंत राज्यातील थकबाकीदार शेतकर्यांसाठी दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे.
या योजनेच्या अंमलबजावणीत राज्यात थकबाकीदार शेतकर्यांकडून ऑनलाइन भरून घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत १५ सप्टेंबरपर्यंंत आहे. त्यानुषंगाने कर्जमाफीसाठी पात्र थकबाकीदार शेतकर्यांकडून ‘ऑनलाइन’ अर्ज भरून घेण्याचे काम १५ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश अकोला जिल्हय़ासह राज्यातील सर्वच जिल्हाधिकार्यांना मुख्यमंत्र्यांनी दिले. कर्जमाफी योजनेच्या अकोला जिल्हय़ातील अंमलबजावणीची माहिती जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी मुख्यमंत्र्यांना दिली. कर्जमाफीसाठी पात्र ठरणारे जिल्हय़ातील शेतकरी व त्यापैकी २३ ऑगस्टपर्यंंत कर्जमाफीचे शेतकर्यांकडून ऑनलाइन भरून घेण्यात आलेल्या अर्जांंची माहितीही जिल्हाधिकार्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’मध्ये दिली.
यावेळी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्यासह जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती, महानगरपालिका आयुक्त अजय लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्यासह कृषी, जिल्हा उपनिबंधक व इतर संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
सुटीच्या तीन दिवसातही भरले जाणार कर्जमाफीचे अर्ज!
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार, थकबाकीदार शेतकर्यांकडून कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्याचे काम १५ सप्टेंबरपर्यंंत पूर्ण करण्यासाठी २५, २६ व २७ ऑगस्ट या सुटीच्या तीन दिवसातही जिल्हय़ातील सेतू केंद्रांवर कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरून घेण्यात येणार आहेत, असे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सांगितले.
पिके, जलसाठय़ाचा घेतला आढावा!
कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीसह जिल्हय़ात आतापर्यंंत झालेला पाऊस, खरीप पिकांची परिस्थिती, धरणांमधील उपलब्ध जलसाठय़ाचा आढावादेखील मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकार्यांकडून घेतला.