हद्दवाढीची प्रक्रिया १ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करा!
By Admin | Updated: August 18, 2016 02:17 IST2016-08-18T02:17:21+5:302016-08-18T02:17:21+5:30
शासनाला राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश

हद्दवाढीची प्रक्रिया १ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करा!
अकोला,दि. १७: राज्यांतील दहा महापालिकांची सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया पाच महिन्यांवर येवून ठेपली आहे. यामध्ये अकोला पालिकेचा समावेश असून, प्रभाग पुनर्रचनेसाठी सर्वच पालिकांना निश्चित कालावधी नेमून दिला जाण्याची शक्यता आहे. शहराचा हद्दवाढीचा मुद्दा ध्यानात घेता कोणत्याही परिस्थितीत १ सप्टेंबरपर्यंत हद्दवाढीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने शासनाला दिले आहेत.
फेब्रुवारी २0१७ मध्ये अकोला महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक पार पडेल. राज्यांतील दहा महापालिक ांच्या निवडणुकीचा कालबद्ध कार्यक्रम घोषित होण्यापूर्वी प्रभागांची पुनर्रचना होणार आहे. यापूर्वी एका प्रभागात दोन नगरसेवकांचे कामकाज चालायचे. शहरातील ३६ प्रभागात ७३ नगरसेवक आहेत. यातील एका प्रभागात तीन नगरसेवक आहेत. यंदा मात्र एका प्रभागात चार नगरसेवक राहतील. राज्याच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाने चार नगरसेवकांचा मिळून एक प्रभाग असण्यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर अर्थातच आता प्रभागांची पुनर्रचना प्रक्रिया केली जाईल. गुगल नकाशाद्वारे होणारी ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. प्रगणकांनी निश्चित केलेली लोकसंख्या व प्रभागांच्या भौगोलिक परिस्थितीवर थेट राज्य निवडणूक आयोगाद्वारे निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आहे. यादरम्यान, अकोला महापालिकेच्या हद्दवाढीची प्रक्रिया सुरू आहे. यासंदर्भात मध्यंतरी नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी बैठक बोलावून मनपा आयुक्त अजय लहाने यांना निर्देशही दिले होते. हद्दवाढीत शहरालगतच्या २४ गावांचा समावेश होणार असल्याने ग्राम विकास विभागाचा अभिप्राय नगर विकास विभागाला प्राप्त झाला आहे. निवडणुकीचा अल्प कालावधी लक्षात घेता १ सप्टेंबरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत हद्दवाढीची प्रक्रिया पूर्ण करण्याची स्पष्ट सूचना राज्य निवडणूक आयोगाने शासनाला केल्याची माहिती आहे.
७८0 पेक्षा अधिक प्रगणक गटांची मांडणी
मनपाने नियुक्त केलेल्या प्रगणकांच्या माध्यमातून सुमारे ७८0 पेक्षा जास्त प्रगणक गटांची मांडणी नगर रचना विभागाने गुगल मॅपिंगच्या आधारे केली.
२0११ च्या जनगणनेतील लोकसंख्येच्या निकषानुसार एका गटात किमान ५00 ते ६00 लोकसंख्येचा समावेश आहे.
ही संपूर्ण माहिती नगर रचना विभागाने जमा केल्यानंतर प्रस्तावित प्रभाग रचनेचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केला.
कॅबिनेटची मंजुरी बाकी
ग्राम विकास विभागाने महापालिकेच्या हद्दवाढीला हिरवा कंदील दर्शवला आहे. ग्राम विकास विभागाचा अभिप्राय मुख्यमंत्र्यांकडे जाईल. त्यानंतर मंत्रिमंडळाची मंजुरी अपेक्षित आहे.
गावांची माहिती अंतिम टप्प्यात
मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने पालिकेने प्रस्तावित २४ गावांमधील प्रगणक गटांची माहिती जमा करण्याचे काम सुरू केले आहे. आयुक्त अजय लहाने यांनी नगर रचना विभाग व निवडणूक विभागातील कर्मचार्यांना तसे निर्देश दिले आहेत.