सिंचन प्रकल्पांची कामे तातडीने पूर्ण करा!
By Admin | Updated: December 16, 2015 02:14 IST2015-12-16T02:14:30+5:302015-12-16T02:14:30+5:30
मुख्यमंत्र्यांचे निर्देश; शहरातील वीज वाहिन्यांची कामे भूमिगत पद्धतीने करण्याच्या सूचना.

सिंचन प्रकल्पांची कामे तातडीने पूर्ण करा!
अकोला: जिल्ह्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्पांची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिले. अकोला शहरातील वीज वाहिन्यांची कामे नागपूरच्या धर्तीवर भूमिगत पद्धतीने करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान मंगळवारी दुपारी नागपूर येथे आयोजित बैठकीत मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील विविध समस्यांचा आढावा घेतला. यावेळी प्रामुख्याने पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, अ. गोवर्धन शर्मा, आ. हरीश पिंपळे, आ. प्रकाश भारसाकळे, आ. रणधीर सावरकर, आ. बळीराम सिरस्कार, अपर मुख्य सचिव आनंद कुलकर्णी, व्ही. गिरीराज, सुजाता सैनिक, सचिव मनीषा म्हैसकर, प्रभाकर देशमुख, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंह, महानगरपालिका आयुक्त अजय लहाने उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील विविध समस्यांचा आढावा घेत, कवठा बॅरेज, उमा बॅरेज, काटेपूर्णा बॅरेज, काटीपाटी बॅरेज आदी सिंचन प्रकल्पांच्या कामांचा आढाव घेतला. त्यामध्ये कवठा व काटीपाटी बॅरेज प्रकल्पाची व्यवहार्यता तपासून पाहण्याचे त्यांनी सांगितले. काटेपूूर्णा बॅरेजचे काम ५0 टक्के पूर्ण झाले असून, उर्वरित काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. उमा बॅरेजसाठी पुनर्वसनाच्या कामासह या प्रकल्पासाठी लागणार्या निधीबाबतची माहिती घेत, जिल्ह्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्पांची प्रलंबित असलेली कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी जलसिंचन विभागाला दिले.अकोला शहरातील वीज वाहिन्यांची कामे नागपूरच्या धर्तीवर भूमिगत पद्धतीने करण्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारून ही कामे पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या, टंचाईच्या परिस्थितीसह विविध समस्या, मुद्दय़ांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत घेतला.