जलयुक्तची कामे जूनअखेर पूर्ण करा!
By Admin | Updated: May 11, 2017 07:17 IST2017-05-11T07:17:15+5:302017-05-11T07:17:15+5:30
जलसंधारण मंत्र्यांचे बैठकीत निर्देश

जलयुक्तची कामे जूनअखेर पूर्ण करा!
अकोला : गेल्या दोन वर्षांच्या काळानंतरही अपूर्ण असलेली जलयुक्त शिवार आराखड्यातील कामे ३० जूनपर्यंत पूर्ण करा, असे निर्देश राज्याचे जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी नियोजन भवनमध्ये सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले.
यावेळी पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, महापौर विजय अग्रवाल, खासदार संजय धोत्रे, आमदार सर्वश्री गोवर्धन शर्मा, प्रकाश भारसाकळे, रणधीर सावरकर, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, कृषी सहसंचालक एस.आर. सरदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
२०१६-१७ वर्षात १२५ गावांमध्ये विविध यंत्रणेद्वारे ७९२ कामे पूर्ण झाली. त्यासाठी एकूण १२.८४ कोटी रुपये निधी खर्च झाला. २०१५-१६ मध्ये गाळ काढण्याच्या मोहिमेत खोलीकरण, रुंदीकरणाची ४७३ कामे करण्यात आली. त्यामध्ये ३४.६६ लक्ष घ.मी. गाळ काढण्यात आला, तर सन २०१६-१७ या वर्षात ७३ कामांतून १२.३३ लक्ष घ.मी. गाळ काढण्यात आला.
चालू वर्षात जिल्ह्यातील १४४ गावांची निवड करण्यात आली. मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत जिल्ह्यास ३५०० शेततळ्यांचे लक्ष्यांक आहे. त्यापैकी ३८१ शेततळे पूर्ण झाली आहेत. ३५३ शेततळ्यांची कामे प्रगतिपथावर आहेत. धरणे व जलसाठ्याच्या साठवण क्षमतेत वाढ होण्यासाठी गाळ काढून शेतात वापरण्यासाठी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना शासनाने सुरू केली.
लघू पाटबंधारे तलाव, साठवण तलाव, गाव तलाव, पाझर तलाव इत्यादी ५० तलावांतील गाळ स्थानिक शेतकऱ्यांना मोफत दिला जात आहे. त्यांना स्वखर्चाने वाहून न्यावा लागणार आहे.
गाळ काढणाऱ्या यंत्रणेच्या इंधनाचा खर्च शासन करणार आहे. शेतकऱ्यांनी गाळ काढण्याच्या मागणीचे प्रस्ताव तहसीलदारांना सादर करावे, असे आवाहनही प्रा. शिंदे यांनी केले.