पुसद अर्बन बँकेच्या अध्यक्षांसह तिघांविरुद्ध पाेलिसांत तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:24 IST2021-07-07T04:24:22+5:302021-07-07T04:24:22+5:30
अकाेला : सिव्हिल लाइन्स पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील मालमत्ता पुसद अर्बन बँकेत तारण देऊन कर्ज घेतल्यानंतर त्या कर्जाची परतफेड करताना ...

पुसद अर्बन बँकेच्या अध्यक्षांसह तिघांविरुद्ध पाेलिसांत तक्रार
अकाेला : सिव्हिल लाइन्स पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील मालमत्ता पुसद अर्बन बँकेत तारण देऊन कर्ज घेतल्यानंतर त्या कर्जाची परतफेड करताना काही रक्कम थकीत असल्याने बँकेच्या अध्यक्षासह तिघांनी घुसखाेरी करीत मालमत्तेवर ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मालमत्ताधारक रायपुरे यांनी या तिघांची सिव्हिल लाइन्स पाेलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. विशेष म्हणजे मालमत्तेचा बँकेने ताबा घेऊ नये, असा आदेश उच्च न्यायानयाने दिलेला असतानाही हा प्रकार झाल्याने त्यांनी न्यायालयाच्या आदेशाचीही अवहेलना केली आहे़
पुसद अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक पुसद या बँकेच्या नागपूर बुटीबोरी शाखेतून अकोला येथील प्रशांत मधुकरराव रायपुरे व अतुल मधुकरराव रायपुरे यांनी त्यांच्या भागीदारी फर्मसाठी मालमत्ता तारण देऊन कर्ज घेतले आहे. सदर कर्ज थकीत झाल्यानंतर या कर्ज प्रकरणाच्या अनुषंगाने रायपुरे यांनी उच्च न्यायालयामध्ये प्रकरण दाखल केले आहे. या कर्ज प्रकरणात तारण असलेल्या मालमत्तेचा बँकेने ताबा घेऊ नये, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना व मालमत्तेचा ताबा घेऊ नये, असा आदेश असतानाही बँकेचे अध्यक्ष शरद अप्पाराव तसेच विशेष वसुली अधिकारी गजानन बापूराव पोळकट व आनंद धोटे यांनी रायपुरे यांच्या राऊतवाडीतील मधुनंदा अपार्टमेंटमधील फ्लॅट क्र. ३०१, ३०२, ३०३ व ४०३ अशा एकूण ४ फ्लॅटचा काही लोकांना सोबत घेऊन घुसखोरी करीत ताबा घेण्याचा प्रयत्न केला. याबाबतची माहिती होताच रायपुरे त्या ठिकाणी पोहोचले व या तिघांनाही गैरकृत्य थांबविण्याचे सांगितले. स्थावर मालमत्तेवर मनाई हुकूम असताना ताबा घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध तसेच रायपुरे यांना शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत रायपुरे व अतुल रायपुरे यांनी सिव्हिल लाइन पोलीस स्टेशन व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दिली आहे. पाेलिसांनी या प्रकरणाची चाैकशी सुरू केली आहे़