अवैध सावकारीतून जमीन हडपल्याची तक्रार
By Admin | Updated: July 8, 2014 21:46 IST2014-07-08T21:46:39+5:302014-07-08T21:46:39+5:30
अवैध सावकारीतून जमीन हडपल्याची तक्रार तालुक्यातील गोरेगाव येथील शेतकर्याने मूर्तिजापूर पोलिस स्टेशनमध्ये दिली आहे.

अवैध सावकारीतून जमीन हडपल्याची तक्रार
मूर्तिजापूर : अवैध सावकारीतून जमीन हडपल्याची तक्रार तालुक्यातील गोरेगाव येथील शेतकर्याने मूर्तिजापूर पोलिस स्टेशनमध्ये दिली आहे. मूर्तिजापूर तालुक्याच्या गोरेगाव येथील शेतकरी प्रकाश लक्ष्मण चोपडे या २६ वर्षीय शेतकर्याची गोरेगाव येथेच गट क्रमांक ६३ मध्ये १ हेक्टर ३७ आर शेती आहे. त्यांनी २0१२ मध्ये आईचा आजार आणि बहिणीच्या लग्नासाठी मूर्तिजापूर येथील गोयनकानगरात राहणारे महादेव गोमासे, तसेच त्यांची पत्नी मंदाबाई गोमासे यांच्याकडून काही रक्कम उसणवारी म्हणून घेतली. ही रक्कम थोडेथोडे करीत दीड लाख रुपयांपर्यंत गेली. या रकमेपोटी महादेव गोमासे आणि मंदाबाई गोमासे यांनी प्रकाश चोपडे यांची शेती आपल्या नावे करून घेतली. प्रकाश चोपडे यांनी गोमासे यांच्याकडून घेतलेल्या रकमेची दरमहा ५ ते १0 टक्के व्याजदराने परतफेड करताना एकूण ३ लाख ७0 हजार रुपये चुकविले; परंतु एवढी रक्कम दिल्यानंतरही गोमासे यांच्याकडून प्रकाश चोपडे यांच्याकडे पैसे शिल्लक असल्याचे सांगत ते चुकविण्याची मागणी केली. या संदर्भात माहिती घेण्यासाठी प्रकाश चोपडे हे त्यांचे वडील लक्ष्मण चोपडे आणि भाऊ सुमेध चोपडे, तसेच गावातील उद्धव नामदेव जाधव यांच्यासह गोमासे यांच्या घरी गेले असता गोमासे व त्यांच्या पत्नी मंदाबाई यांनी प्रकाश चोपडेसह त्यांचे वडील लक्ष्मण चोपडे आणि भाऊ सुमेध यांना जातीवाचक शिवीगाळ केली, तसेच लक्ष्मण चोपडे यांना मारहाण करीत पैसे न दिल्यास गावातून धिंड काढण्याची धमकीही दिली, असे प्रकाश चोपडे यांनी मूर्तिजापूर पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत नमूद केले असून, या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या तक्र ारीची प्रत केंद्रीय गृहमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्याचे गृहमंत्री, पोलिस महासंचालक, पोलिस आयुक्त अमरावती, जिल्हाधिकारी अकोला, पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी मूर्तिजापूर आदींकडे पाठविण्यात आली आहे.