मारहाणप्रकरणी गावक-यांची पोलिसांकडे तक्रार

By Admin | Updated: April 24, 2015 02:12 IST2015-04-24T02:12:12+5:302015-04-24T02:12:12+5:30

तक्रारीची नोंद; अतिरिक्त पोलीस अधीक्षकांकडे तपास.

Complaint against the villagers | मारहाणप्रकरणी गावक-यांची पोलिसांकडे तक्रार

मारहाणप्रकरणी गावक-यांची पोलिसांकडे तक्रार

अकोला - कापशी तलाव येथील गावकर्‍यांना पोलिसांनी घुडगूस घालून केलेल्या मारहाणप्रकरणी बुधवारी रात्री उशिरा गावकर्‍यांनी पोलीस तक्रार केली. या तक्रारीची नोंद घेत तपास अतिरिक्त पोलीस अधीक्षकांकडे सोपविण्यात आला. कापशी येथे मंगळवारी रात्री जुगारींवरील कारवाईवरून झालेल्या वादानंतर पोलिसांनी गावकर्‍यांना अमानुष मारहाण करून घर व गाड्यांची तोडफोड केली होती. मुलं, महिला, वृद्ध आणि रुग्णांनासुद्धा बेदम मारहाण करून त्यांना गंभीर दुखापत केली. अक्षय्यतृतीयेला रात्री ११ वाजता घडलेल्या या प्रकरणाची अखेर कापशी तलाव येथील पुरुषोत्तम दिनकर चतरकर व किशोर दगडू मानदकर यांनी पातूर पोलीस ठाण्यात तक्रार केली. ५0 ते ६0 अनोळखी लोकांनी संपूर्ण गावांतील ३७ मोटरसायकली व वाहनांची तोडफोड करून चार लाख रुपयांचे नुकसान केले तसेच घरातील टीव्ही, पंखे, आलमार्‍या, फ्रिज यांची तोडफोड करून २0 हजारांचे नुकसान केले, असे तक्रारी म्हटले आहे. या घटनेत किशोर दगडू मानतकर, मोहन बन्सीराम सुरोसे, मनोहर दौलतराव येवले, डिगांबर सहदेव महल्ले, आशा अनंत तायडे, विक्रम मोहन येवले, पुरुषोत्तम सुधाकर चतरकर हे जखमी झाले असल्याचे तक्रारीत नमूद आहे. या तक्रारीची नोंद घेण्यात आली असून, वरिष्ठ अधिकार्‍यांकडे पाठविण्यात आली असल्याचे पातूरचे ठाणेदार खिल्लारे यांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास अतिरिक्त पोलीस अधीक्षक नीकेश खाटमोडे यांच्याकडे देण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. जखमीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

Web Title: Complaint against the villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.