कृषी विभागाची पोलिसांत तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2016 02:19 IST2016-03-24T02:19:32+5:302016-03-24T02:19:32+5:30
बोर्डी येथील वांझोटी केळी रोपे प्रकरण; आंबोडा येथील गुन्ह्यात होणार समावेश.

कृषी विभागाची पोलिसांत तक्रार
आकोट: बोगस व निकृष्ट दर्जाच्या केळी रोपांचा पुरवठा केल्यामुळे आकोट तालुक्यातील बोर्डी येथील केळी उत्पादक शेतकर्यांचे एकूण ४४ लाख ४४ हजार ३७३ रुपयांचे नुकसान झाल्याने याप्रकरणी कायदेशीर कारवाईसाठी उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाने सोमवारी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यापूर्वी आंबोडा येथील केळी उत्पादक शेतकर्यांची २४ लाख रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. बोर्डी येथील तक्रारही आंबोडा येथील गुन्हय़ात समाविष्ट करण्यात यावी, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
बोर्डी येथील शेतकर्यांनी रमेश रामचंद्र आकोटकरकडे इंद्रायणी कंपनीच्या रोपांची मागणी नोंदविली होती. यासाठी शेतकर्यांनी अग्रीम रकमेचाही भरणा केला; मात्र त्यांना पुसद येथील वसंत बायोटेकची पावती देण्यात आली. त्यामुळे शेतकर्यांनी आकोटकरला जाब विचारला. ह्यइंद्रायणी कंपनीचे कंद वसंत बायोटेक व खेड येथील माउली हायटेक नर्सरीकडे प्रोसेसिंगसाठी पाठविले असल्याने पावती वसंत बायोटेक किंवा माउलीच्या नावे द्यावी लागते.
रोपे ही इंद्रायणी कंपनीचीच देण्यात येतील,ह्ण असे शेतकर्यांना सांगण्यात आले; मात्र निकृष्ट दर्जाची रोपे देऊन फसवणूक केल्याचे समोर आले असून, याबाबत कारवाई करण्याची मागणी शेतकर्यांकडून होत आहे. त्यांनी आता जी-९ या जातीच्या वाणाची लागवड केली होती.
केळीची वाढ खुंटली!
केळीच्या पिकावर रोपे खरेदी, ड्रिंचिंग, फवारणी, खत, मजुरी व इतर मशागतीवर शेतकर्यांनी भरपूर खर्च केला; मात्र केळीच्या झाडांना केवळ चार ते पाच फण्यांचे घड लागले. सदर बाबसुद्धा त्यांनी रमेश आकोटकरांना कळविली होती; मात्र त्यांनी वातावरणाच्या दोषामुळे केळीच्या झाडांवर परिणाम होत असल्याचे आम्हाला सांगितले होते. शेतकर्यांनी बोर्डी येथील दुसर्या कंपनीकडून घेतलेल्या केळीच्या रोपांची वाढ, बाग उत्तम असल्याचे सांगितले. या दुसर्या कंपनीने दिलेल्या रोपांवर वातावरणाचा परिणाम का झाला नाही, असा सवाल शेतकर्यांनी उपस्थित केला. यावर आकोटकरांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे.