पोलिसांच्या दडपशाहीविरोधात आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
By Admin | Updated: August 30, 2016 02:02 IST2016-08-30T02:02:30+5:302016-08-30T02:02:30+5:30
हिंदूंच्या सणांच्या बाबतीत न्यायालयाच्या नावावर अकोला पोलिसांनी प्रचंड दडपशाही सुरू असल्याचा आरोप.

पोलिसांच्या दडपशाहीविरोधात आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
अकोला, दि. २९: शिवाजी पार्क परिसरात पोलिसांनी केलेल्या दडपशाहीमुळे येथील एका व्यावसायिकाचा हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याचा आरोप करीत पोलिसांच्या या दडपशाहीची आ. गोवर्धन शर्मा आणि आ. रणधीर सावकर यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली. या दोन्ही आमदारांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पोलिसांचा हिंदूंच्या धार्मिक सण-उत्सवामध्ये अतिरेक वाढतच असल्याचीही माहिती यावेळी या आमदारांनी मुख्यमंत्र्यांना दिली.
हिंदूंच्या सणांच्या बाबतीत न्यायालयाच्या नावावर अकोला पोलिसांनी प्रचंड दडपशाही सुरू केली आहे. शहरामध्ये दहशत निर्माण करण्याचे काम पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले असून हा प्रकार तत्काळ रोखण्यात यावा, अशी मागणीही शर्मा आणि सावरकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे सोमवारी केली. राजराजेश्वराचा पालखी कावड यात्रा महोत्सव शांततेत सुरू असताना आणि कोणतेही कारण नसताना बाजारपेठेतील दुकाने बंद करण्यास पोलीस प्रशासनाने भाग पाडले. पोलिसांनी दुकाने बंद करण्यासाठी केलेल्या अतिरेकी कारवाईमुळे शिवाजी पार्क येथील व्यावसायिक प्रकाश अंबादास येळमे (६१) यांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाल्याचेही आ. गोवर्धन शर्मा व आ. रणधीर सावरकर यांनी मुख्यमंत्री यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना सांगितले. गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस प्रशासनाकडून हा प्रकार सुरू असून सरकारविषयी जनतेमध्ये असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न अकोला पोलीस करीत असल्याचा आरोपही या दोन आमदारांनी मुख्यमंत्री यांना दिलेल्या तक्रारीत केला आहे. येणार्या काळात गणपती तसेच नवरात्रामध्येसुद्धा असा प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलीस प्रशासन सरकारविरुद्ध अशा प्रकारचे कृत्य करून जनभावना भडकविण्याचा प्रयत्न करीत असून यावर मुख्यमंत्र्यांनी त्वरित कारवाई करण्याची गरज असल्याचेही या दोन आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे स्पष्ट केले.
न्यायालयात निर्दोष सुटलेले तडीपार
शहरातील काही युवकांना तडीपार करण्यात आले आहे. ज्या युवकांनी दीड ते दोन वर्ष कारागृहात काढल्यानंतर ते निर्दोष सुटले अशा युवकांना वेठीस धरण्यासाठी त्यांना तब्बल दोन वर्षांंसाठी जिल्हय़ातून तडीपार करण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आले. पोलीस प्रशासनाने न्यायालयाच्या नावाखाली हिंदू धर्मीयांना वेठीस धरण्याचा सपाटाच लावला असून यावर तातडीने अंकुश मिळविण्याचे प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी करावे, असेही आ. शर्मा व सावरकर यांनी निवेदनात स्पष्ट केले.