तक्रार करताय, आधी नियमांची पूर्तता करा!
By Admin | Updated: January 3, 2015 01:27 IST2015-01-03T01:27:02+5:302015-01-03T01:27:02+5:30
अकोला मनपाचा निर्णय; नागरिकांचा आखडता हात

तक्रार करताय, आधी नियमांची पूर्तता करा!
आशिष गावंडे / अकोला
प्रभागातील अवैध बांधकाम असो वा नाल्या-सर्व्हिस लाइन, बंद पथदिवे किंवा रस्ते साफसफाईची समस्या, ती दूर करण्यासाठी नागरिक मनपाकडे तक्रारी करतात. यापुढे मात्र अशा तक्रारी करताना संबंधिताना दहावेळा विचार करावा लागेल. आधी नियमांची पूर्तता करा, त्यानंतरच तक्रारींची दखल घेतल्या जाईल,अशा स्वरूपाची नियमावलीच मनपाने जारी केली आहे. नियमावली पाहून अकोलेकरांनी आखडता हात घेतल्याची परिस्थिती आहे.
अकोलेकरांना नियमित पाणीपुरवठा, पथदिव्यांची सुविधा, नाल्या-सर्व्हिस लाइनची दैनंदिन साफसफाई, रस्त्यांची झाडपूस, पायी चालण्यासाठी फुटपाथ व प्रशस्त रस्ते आदी मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी मनपा प्रशासनाची आहे. नियमित मालमत्ता कर, पाणीपट्टीसह मनपाच्या इतर नियमांची पूर्तता करून कर जमा करण्याची नैतिक जबाबदारी अकोलेकरांचीसुद्धा आहे. शहरात १ लाख ३0 हजारपेक्षा जास्त मालमत्ताधारकांची मनपाकडे नोंद आहे. यामधील अवघे ३५ ते ४0 हजार मालमत्ताधारक मनपाचे दायित्व अदा करतात. परिणामी प्रशासनाला पुरेसे उत्पन्न प्राप्त होत नसल्याने मूलभूत सोयी-सुविधा पुरविताना प्रशासनाची दमछाक होते. साहजिकच शहरात समस्या निर्माण होतात. नागरिकांना भेडसावणार्या तक्रारींचे निरसन करण्यात नगरसेवक अपयशी ठरल्यानंतर मनपाकडे धाव घेतल्या जाते. यातही अवैध बांधकामाच्या तक्रारी क्लिष्ट स्वरूपाच्या असतात. यावर तोडगा न निघाल्यास तक्रारींचा महापूर साचतो. यावर उपाय म्हणून मनपा उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी तक्रारींचे निरसन करण्यापूर्वी नागरिकांनी मनपाच्या नियमांची पूर्तता करण्यासाठी एक नियमावलीच जारी केली. यामध्ये अर्जदाराचे नाव, तक्रारीचे स्वरूप, चालू वर्षाचा मालमत्ता कर-पाणीपट्टी जमा केल्याचा गोषवारा, तसेच घर बांधकामाची परवानगी व परवानगीचा क्रमांक, दिनांक नमूद करण्याचा समावेश आहे. नळ कनेक्शन असल्यास परवानगी क्रमांक, दिनांक व अवैध असल्यास वैधतेकरिता प्रयत्न केले काय, इमारतीमध्ये अग्निशमनची व्यवस्था केली काय आदी माहिती देणे बंधनकारक करण्यात आले. तक्रार स्वीकारण्याची जबाबदारी क्षेत्रीय अधिकार्यांवर सोपवण्यात आली. मनपाने जारी केलेली नियमावली लक्षात घेता, संबंधित व्यक्तीने नियमांची पूर्तता केली असेल तरच तक्रारीला प्राधान्य दिले जाईल, असे दिसून येते. या नियमावलीमुळे मागील काही दिवसांत मनपाकडे तक्रारींचा खच कमी झाल्याची माहिती आहे.