काँग्रेस नगरसेविकेच्या अपात्रता प्रस्तावाला आयुक्तांची मंजुरी
By Admin | Updated: October 21, 2014 00:19 IST2014-10-21T00:19:55+5:302014-10-21T00:19:55+5:30
अवैध बांधकाम प्रकरणात अकोला मनपातील कॉग्रेस नगरसेविका दोषी.

काँग्रेस नगरसेविकेच्या अपात्रता प्रस्तावाला आयुक्तांची मंजुरी
अकोला : काँग्रेसच्या नगरसेविका जैनबबी शेख इब्राहिम यांनी उभारलेले बांधकाम अवैध असल्याचा मुद्दा ग्राह्य धरत त्यांच्या नगरसेविका पदाच्या अपात्रता प्रस्तावाला मनपा आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी मंजुरी दिली. हा विषय अंतिम मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेत सादर करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. प्रभाग क्र. १३ मधील नगरसेविका जैनबबी शेख इब्राहिम यांनी निवडणूक शपथपत्रात खोटी माहिती सादर केल्याप्रकरणी युसूफ सुकीवाले यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. अनधिकृत बांधकाम केल्याची तक्रार मनपा प्रशासनाकडे करण्यात आली. मनकर्णा प्लॉटमधील नझुल प्लॉट क्र. १५, नझुल शिट क्र.३७ बी येथे मंजूर नकाशापेक्षा जास्त बांधकाम केल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानुषंगाने नगररचना विभागाच्यावतीने इमारतीचे मोजमाप घेण्यात आले असता, एकूण इमारतीमध्ये १२७.0५ चौरस मीटर अनधिकृत बांधकाम केल्याचे समोर आले. इमारतीच्या तिसर्या माळ्य़ाचे बांधकाम पूर्णत: विनापरवानगी असल्याचा शेरा नगर रचना विभागाने दिला. यासंदर्भात मनपा आयुक्तांनी सुनावणी घेतली. निष्कर्षाअंती नगरसेविका जैनबबी शेख इब्राहिम यांच्या अपात्रता प्रस्तावाला डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी मंजूरी देत, या विषयाला अंतिम मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेसमोर मांडण्याचे निर्देश नगर सचिव कार्यालयाला दिले आहेत. सभागृहाच्या निर्णयानंतर हा प्रस्ताव न्यायालयात ठेवला जाईल.