आयुक्तांच्या आदेशाला उपायुक्तांचा ठेंगा
By Admin | Updated: May 12, 2014 00:30 IST2014-05-12T00:27:23+5:302014-05-12T00:30:22+5:30
मुख्य मार्गावरील अतिक्रमण तत्काळ हटवण्याच्या आदेश

आयुक्तांच्या आदेशाला उपायुक्तांचा ठेंगा
अकोला : शहराच्या मुख्य मार्गावरील अतिक्रमण तत्काळ हटवण्याच्या आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या आदेशाला उपायुक्त डॉ.उत्कर्ष गुटे यांनी केराची टोपली दाखवली आहे. आयुक्तांचे लेखी आदेश प्राप्त होऊन अकरा दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. यामुळे कर्तव्यदक्ष म्हणून जनमानसात ओळख असलेले डॉ.उत्कर्ष गुटे अतिक्रमण हटवण्यासाठी नेमकी कोणती तयारी करीत आहेत, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरातील मुख्य रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहेत. मनपाकडे लाखो रुपयांचा कर जमा करणार्या व्यापारी-व्यावसायिकांच्या दूकानांसमोरच फेरीवाल्यांनी ठाण मांडले आहे. त्यावर आधी दुकानासमोरील अतिक्रमण हटवा, त्यानंतर मालमत्ता कर जमा करतो, अशी भूमिका व्यावसायिकांनी घेतली आहे. शिवाय रस्त्यालगतच अतिक्रमकांनी बाजार मांडल्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. यासर्व बाबी लक्षात घेता, आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी मुख्य मार्गावरील अतिक्रमण तत्काळ हटवण्याचे आदेश उपायुक्त डॉ. उत्कर्ष गुटे यांना जारी केले होते. आयुक्तांच्या आदेशावर अकरा दिवसानंतरही कारवाई होत नसल्याने कर्तव्यदक्ष डॉ.गुटे यांची कार्यप्रणाली पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. यासंदर्भात डॉ.गुटे यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.