शहराचे विद्रूपीकरण थांबवण्यासाठी समोर या!
By Admin | Updated: October 7, 2015 02:06 IST2015-10-07T02:06:55+5:302015-10-07T02:06:55+5:30
मनपा आयुक्तांचे अकोलेकरांना आवाहन.

शहराचे विद्रूपीकरण थांबवण्यासाठी समोर या!
अकोला: शहराची भौगोलिक रचना अत्यंत उत्कृष्ट आहे; परंतु अतिक्रमणाच्या समस्येमुळे शहराचे विद्रूपीकरण झाले असून, रस्त्यालगत मांडलेला बाजार व वाहतुकीच्या कोंडीमुळे शहराचे तीन तेरा वाजले आहेत. आगामी दिवसात प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण व सुशोभीकरणाची कामे होतील. याकरिता नगर नियोजन विभागाच्या सशक्तीकरणाची गरज असून, संबंधित विभागाशी तज्ज्ञ अकोलेकरांनी साथ देण्याचे आवाहन मंगळवारी आयुक्त अजय लहाने यांनी केले. महापालिक ा क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात अनधिकृत इमारतींचे बांधकाम झाले आहे. मनपाच्या नगर रचना विभागाकडून रितसर नकाशा मंजूर केल्यानंतरही बांधकाम व्यावसायिक नियमापेक्षा जास्त बांधकाम करतात. यामुळे विविध समस्या निर्माण होत आहेत. व्यावसायिक संकुलाची उभारणी केल्यानंतर पार्किंगसाठी राखीव जागा न ठेवल्यामुळे वाहनधारकांना रस्त्यावर वाहने ठेवावी लागतात. यामुळे वाहतूक व्यवस्थेवर ताण येतो. शहराच्या विविध ठिकाणी मनपाच्या जागेवर पार्किंग व्यवस्था उभारण्यात आली असली तरी संबंधित जागेवर अतिक्रमकांनी कब्जा केल्याचे चित्र आहे. लघू व्यावसायिक, फेरीवाल्यांनी रस्त्यालगत दुकाने थाटल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. या सर्व समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी मनपातील नगर नियोजन विभागाला सशक्त करण्याची गरज असल्याचे आयुक्त अजय लहाने यांच्या ध्यानात आले आहे. यावर उपाय म्हणून संबंधित विभागासाठी अकोल्यातील तज्ज्ञ व्यक्तींनी समोर येण्याचे आवाहन आयुक्तांनी केले असून, मनपात येऊन प्रत्यक्ष भेटण्याचे सूचित केले आहे.