सीएम चषक : सत्तेच्या चषकासाठी भाजपाने ‘खेळ मांडला’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 02:08 PM2018-12-12T14:08:27+5:302018-12-12T14:12:31+5:30

राजकारणाच्या सारीपाटावर अशा नियोजनामध्ये सध्या भाजपा सर्वांना वरचढ ठरत असून,राज्यभरात सुरू असलेला ‘सीएम’ चषक हा त्याच नियोजनाचा एक भाग आहे.

 CM Cup: BJP launches 'game for power' | सीएम चषक : सत्तेच्या चषकासाठी भाजपाने ‘खेळ मांडला’

सीएम चषक : सत्तेच्या चषकासाठी भाजपाने ‘खेळ मांडला’

Next

- राजेश शेगोकार

अकोला : राजकीय पक्षांकडून होणाऱ्या प्रत्येक कृतीमागे राजकारण दडलेले असते. एखादी यात्रा, रॅली असो की स्पर्धा असो प्रत्येकातून राजकीय हित कसे साधले जाईल, याचेच नियोजन केले जाते. राजकारणाच्या सारीपाटावर अशा नियोजनामध्ये सध्या भाजपा सर्वांना वरचढ ठरत असून,राज्यभरात सुरू असलेला ‘सीएम’ चषक हा त्याच नियोजनाचा एक भाग आहे. खेळाच्या मैदानातून सत्तेच्या खेळासाठी मतांची शिदोरी जमविण्याच्या या प्रयत्नाला राज्यभरात उत्तम प्रतिसाद मिळाला. या प्रतिसादाने भाजपाच्या गोटात सध्या समाधानाचे वातावरण असले तरी पाच राज्याच्या निवडणूक निकालांनी आता निश्चितच समाधानाची जागा चिंतेने घेतली आहे.
लोकसभा व विधानसभा निवडणुकांचा 'खेळ' रंगण्याआधीच भाजपने खेळाच्या मैदानावर राजकीय चषकाचा नवा 'डाव' मांडला आहे. ३० आॅक्टोबर २०१८ ते १२ जानेवारी २०१९ दरम्यान 'सीएम चषक' क्रीडा महोत्सव सध्या सर्वत्र गाजत आहे. युवक मतदार डोळ्यासमोर ठेवून ही स्पर्धा घेण्यात येत असून, या स्पर्धेत १८ वर्षांखालील खेळाडू मोठ्या संख्येत सहभागी व्हावे, असे निर्देश पक्षाकडून पदाधिकाºयांना मिळाले आहेत. त्यासाठी आॅनलाइन नाव नोंदणीत खेळाडूंना वैयक्तिक माहितीसह शहराचे नाव व आपल्या मतदारसंघाचीही माहिती द्यावी लागत असून, विशेष म्हणजे शहरी भागात तर वॉर्डनिहाय स्पर्धाही होत आहेत. त्यामुळे सहाजीकच खेळांच्या आडून मतांचा खेळ रंगला आहे; मात्र पाच राज्यातील निकालांनी या खेळाचा आनंद काहीसा हिरावला गेला आहे. काँग्रेसने ज्या पद्धतीने या राज्यांमध्ये मुसंडी मारली आहे, ही प्रातिनिधीक असून, भाजपाप्रति असाच सुप्त रोष अकोल्यातही आहे, तो प्रकट झाला तर सत्तेचा चषक हातातून जाण्यास वेळ लागणार नाही.
या पृष्ठभूमीवर अकोल्यातील भाजपाच्या सत्तेच्या खेळावर नजर टाकली तर डोळे दीपवून टाकणाºया कोट्यवधीच्या विकासकामांची आकडेवारी पदाधिकारी समोर टाकतात. जाडजुड रस्त्यांच्या विकास कामांचे दाखले देतात; मंजूर, प्रस्तावित अन् निर्माणाधिन या तीन शब्दातच विकास कामांची जंत्री समोर ठेवली जाते. प्रत्यक्षात मात्र वर्षा दोन वर्षापासून अर्धवट कामांनी जनता त्रस्त झाली आहे. विकासकामे सुरू झाल्यावर ती जादूची कांडी फिरवावी, अशी लगेच पूर्ण होतील, ही अपेक्षाही नाही; पण तीन किलो मीटरचे रस्ते पूर्ण व्हायला तीन-तीन वर्ष लागत असतील तर विकासाची गती ही फक्त निवडणुकीवर डोळा ठेवूनच आहे, हे आता जनतेला चांगलेच कळते.
जी महापालिका भाजपाला एक हाती दिली, त्या महापालिका अधिकाºयाविना रिकामी झाली आहे. ठरावीक नगरसेवकांनाच विकासाचा निधी मिळतो, अशी ओरड खुद्द सत्ताधारी पक्षातच सुरू झाली आहे. दुसरीकडे नगरसेवकांना बॅकिंग देण्याऐवजी कंत्राटदारांची पाठराखण करण्यातच धन्यता मानली जात असल्याचे चित्र आहे. एका वसाहतीमध्ये एका पदाधिकाºयाला कंत्राटदाराने दमदाटी करून त्याच्यावर हात उगारल्यावर पोलीस तक्रार होऊ नये म्हणून पदाधिकाºयावरच भावनिक दबाव टाकून प्रकरण निस्तारण्याचाही प्रकार झाल्याचे समोर आले आहे. अशा स्थितीत पुन्हा सत्तेचा चषक जिंकण्याची तयारी करायची असेल, तर भाजपाला जमिनीवर यावे लागणार आहे. त्यातच भाजपामध्ये खासदार व नामदार असे दोन गट उघडपणे कार्यरत आहेत. या दोन्ही गटांमध्ये सतत कुरघोडीचे राजकारण सुरू असते, त्यामुळे सामान्य भाजपा कार्यकर्ता हा संभ्रमित आहे. एका गटाच्या नेत्याकडे काम घेऊन जावे तर दुसरा नाराज होतो. यामध्ये कार्यकर्त्यांची फरपट होत आहे, त्यामुळेच सीएम चषकात रंगलेल्या भाजपाला आता सत्तेचा चषक जिंकायचा असेल, तर ‘विकास’ नावाचा खेळाडूच त्यांना तारू शकेल.

सेनेसोबत समन्वय ठेवणे जिकिरीचे
युतीची चर्चा सुरू आहे. उद्या सेनेसोबत एकत्र लढण्याची वेळ आली, तर गेल्या साडेचार वर्षांत सेनेला दिलेल्या वागणुकीचे उट्टे सेना काढल्याशिवाय राहणार नाही, याची खात्री देता येणार नाही. अशासकीय समित्या असोत की युतीचे सरकार म्हणून सेनेला द्यावा लागणारा सन्मान असो भाजपाने अकोल्यातील शिवसेनेला गृहीत धरून अनुल्लेखानेच मारले आहे, त्यामुळे आता पुन्हा या पक्षासोबत समन्वय ठेवून त्यांना प्रचारात घेण्यासाठी समजूतदारीची भूमिका भाजपाला घ्यावी लागणार आहे.


कमकुवत विरोधक हे भाजपाचे शक्तिस्थळ
अकोल्यात भाजपाचा झंझावात सातत्याने कायम राहण्यामध्ये कमकुवत विरोधक हे सर्वात महत्त्वाचे कारण आहे. ज्या-ज्या वेळी विरोधकांची एकजूट झाली, त्या-त्या वेळी भाजपाला पराभवाचे अस्मान दिसले आहे. आता विरोधकांनाही हे समजले आहे, त्यामुळे पाच राज्यांत ज्याप्रमाणे विरोधकांनी एकत्र येऊन करिष्मा घडविला, तोच कित्ता अकोल्यात गिरविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मतांचे विभाजन टाळण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जाईल, त्यामुळे भावनिक मुद्यांपेक्षा विकास हाच मुद्दा घेऊन भाजपाला सत्तेच्या चषकासाठी मैदानात उतरावे लागणार आहे.

शासनाच्या योजनांचे खेळांना नाव
सीएम चषक अंतर्गत क्रिकेट, खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, अ‍ॅथलेटिक्स, कुस्ती या खेळांचा समावेश करण्यात आला असून, या खेळांना शासनाच्या विविध योजनांचे नाव दिले आहे. यावरून स्पर्धेचा राजकीय हेतू लक्षात येतोच आयुष्मान भारत क्रिकेट, जलयुक्त शिवार व्हॉलीबॉल, शेतकरी सन्मान कबड्डी, सौभाग्य खो-खो, उडाण अ‍ॅथलेटिक्स, मुद्रा योजना शतरंज, स्वच्छ भारत कुस्ती, कौशल्य भारत कॅरम तसेच उज्ज्वला नृत्य स्पर्धा, जनधन एकांकी स्पर्धा, उजाला गायन स्पर्धा, इंद्रधनुष्य चित्रकला स्पर्धा, मेक इन इंडिया रंगोली स्पर्धा, ग्राम ज्योती काव्य वाचन स्पर्धा अशी नावे दिली आहेत.

 

Web Title:  CM Cup: BJP launches 'game for power'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.