हमीभावाने मोडले कापूस उत्पादकांचे कंबरडे
By Admin | Updated: February 5, 2015 01:42 IST2015-02-05T01:42:41+5:302015-02-05T01:42:41+5:30
दरवाढीच्या प्रतीक्षेत थकलेल्या शेतक-यांनी शेवटी कापूस काढला विकायला.

हमीभावाने मोडले कापूस उत्पादकांचे कंबरडे
राजरत्न सिरसाट / अकोला: केंद्रीय कृषी विभागाने हमीभाव जाहीर करताना कापूस उत्पादक शेतकर्यांना निराशेच्या गर्तेत टाकले असूून, या हंगामात बाजारातही कापसाचे सरासरी दर हमीदरापेक्षा कमी म्हणजे ३६00 ते ३९00 रुपये प्रतिक्विंटल असल्याने कापूस उत्पादक शेतकरी प्रंचड आर्थिक कोंडीत सापडला आहे. दर वाढतील, या अपेक्षेत असलेल्या शेतकर्यांनी अखेर कापूस विक्रीला काढला आहे. पण, खासगी बाजारातही लूट होत असल्याने अग्रिम बोनस द्यावे किंवा सामाजिक सुरक्षितता म्हणून शासनाने कापूस उत्पादकांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. केंद्रीय कृषिमूल्य आयोगाने या खरीप हंगामामील लांब धाग्याच्या कापसाला ४0५0 रुपये प्रतिक्विंटल आधारभूत किंमत जाहीर केली आहे. असे असले तरी प्रतवारीचे निकष लावून शेतकर्यांकडून कापसाची खरेदी केली जात असल्याने हमीदर ४0५0 असले तरी प्रत्यक्षात शेतकर्यांच्या पदरी प्रतिक्विंटल ३६00 ते ३९00 रुपये येत आहेत. या दरात शेतकर्यांचा उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. या सर्व प्रतिकूल परिस्थितीमुळे विदर्भातील कापसाचे क्षेत्र घटत असून, आजमितीस हे क्षेत्र १८ लाखांहून घटून १0 लाख हेक्टरपर्यंत खाली आले आहे. यावर्षी अल्प पावसाचा कापूस पिकावर परिणाम झाल्याने उत्पादन घटले आहे. दुसरीकडे उत्पादन खर्चावर आधारित दर मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. दरम्यान, राज्याचे कृषिमंत्री एकनाथराव खडसे यांनी अकोला येथील एका शासकीय सभेत कापूस उत्पादक शेतकर्यांना अग्रिम बोनस देण्यावर विचार चालू असल्याचे संकेत दिले होते. त्यामुळे शेतकर्यांचा अपेक्षा वाढल्या होत्या. पण, अग्रिम बोनसचा विचार झाला नसल्याने शेतकर्यांचा भ्रमनिरास झाला आहे. अखेर दरवाढीच्या प्रतीक्षेत घरी ठेवलेला कापूस शेतकर्यांनी विक्रीला काढला असून, राज्यात आजमितीस जवळपास १३0 लाख क्विंटल कापसाची खरेदी भारतीय कापूस महामंडळ, कापूस उत्पादक पणन महासंघ आणि खासगी व्यापार्यांनी केली आहे.