नगरसेविकेच्या पतीची सफाई कर्मचा-यांना शिवीगाळ
By Admin | Updated: October 29, 2014 01:46 IST2014-10-29T01:46:25+5:302014-10-29T01:46:25+5:30
अकोला पोलिसांत तक्रार.

नगरसेविकेच्या पतीची सफाई कर्मचा-यांना शिवीगाळ
अकोला : प्रभागात नियमित साफसफाई होत नसल्याच्या मुद्यावर भाजपच्या नगरसेविका नम्रता मोहोड यांचे पती मनीष मोहोड यांनी सफाई कर्मचार्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर लागोलाग संतप्त सफाई कर्मचार्यांनी मोहोड यांच्या विरोधात मनपा प्रशासनासह सिव्हिल लाइन पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. आज मंगळवारी ही टना घडली. सफाई कर्मचार्यांचा सतत अपमान केला जातो. अशा स्थितीत संबंधितांवर कारवाई न केल्यास काम बंद करण्याचा इशारा सफाई कर्मचारी संघटनेच्यावतीने मनपा आयुक्तांना देण्यात आला.
प्रभाग क्र.१८ मध्ये खासगी कंत्राटदारामार्फत स्वच्छता केली जात होती. काही दिवसांपासून या प्रभागात आस्थापनेवरील सफाई कर्मचार्यांची नियुक्ती प्रशासनाने केली. एका प्रभागासाठी २0 सफाई कर्मचार्यांची नियुक्ती केली असताना, कामावर मात्र बोटावर मोजण्याइतपत कर्मचारी हजर राहत असल्याची वस्तुस्थिती आहे. शहरातील साफसफाईसह सफाई कर्मचार्यांवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी सहायक आरोग्य अधिकारी सुरेश पुंड तसेच संबंधित स्वच्छता निरीक्षकांची आहे. परंतु, तसे होत नसल्याने प्रभागांमध्ये घाण व कचर्याचे ढीग आहेत.
यामुळे नागरिकांमध्ये रोष असून, प्रभाग क्र.१८ मधील भाजपच्या नगरसेविका नम्रता मोहोड यांचे पती मनीष मोहोड यांनी कामावरील सफाई कर्मचार्याला याच मुद्यावर शिवीगाळ केल्याचा प्रकार २८ ऑक्टोबर रोजी घडला. यासंदर्भात मनपासह सिव्हिल लाइन पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.