अकोला महापालिकेचे वरातीमागून घोडे; म्हणे, नाले सफाईचे काम युध्द पातळीवर
By नितिन गव्हाळे | Updated: June 8, 2024 21:53 IST2024-06-08T21:53:45+5:302024-06-08T21:53:56+5:30
शहरात नाले सफाई होत असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला असला तरी, शहरातील अनेक प्रभागात मान्सूनपूर्व नाले सफाई झालेली नसल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे.

अकोला महापालिकेचे वरातीमागून घोडे; म्हणे, नाले सफाईचे काम युध्द पातळीवर
अकोला: शहरात वादळी वारा व मुसळधार पावसामुळे ६ जून रोजी नाल्या ओव्हरफ्लो होऊन सांडपाणी रस्त्यावर आल्याने, महापालिकेच्या वतीने नाले सफाई कागदावरच सुरू असल्याचे समोर आले होते. आता महापालिकेने वरातीमागून घोडे हाणत, नाले सफाईचे काम युद्धपातळीवर सुरू केल्याचा दावा करीत, शहरातील लहान व मोठे नाले मिळून एकूण २७२ पैकी २३२ नाल्यांची स्वच्छता करण्यात आली असून नाले सफाईचे काम शेवटच्या टप्प्यात असल्याचा दावा केला आहे.
एवढेच नाहीतर शहरातील नाले सफाईनंतर पुन्हा त्याच नाल्यात प्लास्टीकसह कचरा टाकला जात असल्याने, नाल्या तुंबल्याचा युक्तीवाद महापालिका प्रशासनाने केला असून, नाल्यांमध्ये प्लास्टिक कचऱ्या इतरही कचराही नाल्यांमध्ये टाकल्या जात असल्याची बाब मनपा प्रशासनाच्या निर्दशनास आले असल्याचेही म्हटले आहे. त्यामुळे पावसाळ्यात नाल्यातील पाणी तुंबेल व परिसरात पावसाचे पाणी साचेल. ही बाब लक्षात घेऊन नागरिकांनी कोणत्याही प्रकारचा कचरा नाल्यात किंवा परिसरात टाकू नये. शहरातील नाले स्वच्छ राहून पाण्याचा प्रवाह अबाधित राहिला पाहिजे याकरिता अकोला महानगरपलिका क्षेत्रातील नागरिकांनी आपल्या घरात व प्रतिष्ठानात निघणारा ओला व सुका कचरा वेग-वेगळा गोळा करून नाली, नाले, सर्व्हिस लाईन आणि परिसरात इतरत्र न टाकता फक्त मनपाच्या कचरा घंटा गाडीमध्येच कचरा टाकावा. असे असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.सुनिल लहाने यांनी केले आहे.
२७२ पैकी २३२ नाल्याची सफाई, पण दिसत कुठेच नाही
पावसाच्या दणक्यामुळे महापालिकेच्या मान्सूनपूर्व नाले सफाईचे पितळ उघडे पडले असून, शहरातील नाल्यांची साफसफाई झाली असती तर मोठ्या प्रमाणात नाल्या तुंबून सांडपाणी रस्त्यांवर वाहिले नसते. असा आरोप नागरिकांनी केला आहे. महापालिकेचा स्वच्छता विभाग केवळ कागदावर सफाई करून महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. सुनिल लहाने यांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे शहर संघटक नीलेश देव यांनी केला आहे. महापालिकेच्या स्वच्छता विभागाकडून शहरातील २७२ नाल्यांपैकी २३२ नाल्यांची सफाई केल्याचा दावा केला असून, पण नाल्यांचे सफाई झाल्याचे कुठेच दिसत नाही. असेही देव यांनी म्हटले आहे.
प्रभागातील अनेक नाल्या तुंबलेल्या
शहरात नाले सफाई होत असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला असला तरी, शहरातील अनेक प्रभागात मान्सूनपूर्व नाले सफाई झालेली नसल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. अनेक भागांमध्ये नाल्या तुंबलेल्या आहेत. मनपाने कागदावर सफाई करण्यापेक्षा प्रत्यक्षात प्रभागांमध्ये जाऊन नाली सफाईवर भर द्यावा आणि महापालिकेतील अधिकाऱ्यांनी नाले सफाईची प्रत्यक्ष पाहणी करावी. अशी मागणी नागरिकांनी केली आहे.