नगर परिषद निवडणूक, राजकीय हालचालींना वेग

By Admin | Updated: July 8, 2014 21:43 IST2014-07-08T21:43:49+5:302014-07-08T21:43:49+5:30

अकोला जिल्ह्यातील पाच नगर परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड १५ जुलै रोजी होणार आहे. या घोषणेमुळे राजकीय घडामोडीला वेग आला आहे.

City council elections, political movements speed | नगर परिषद निवडणूक, राजकीय हालचालींना वेग

नगर परिषद निवडणूक, राजकीय हालचालींना वेग

अकोला - अकोला जिल्ह्यातील पाच नगर परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड १५ जुलै रोजी होणार आहे. या घोषणेमुळे राजकीय घडामोडीला वेग आला आहे. अकोला जिल्ह्यातील आकोट येथे काँग्रेसची तर तेल्हार्‍यात भाजप, बाळापुरात नगरविकास आघाडी, पातुरात राकाँची तर मूर्तिजापुरात काँग्रेस-भारिपची सत्ता आहे. या नगरपरिषदांचा कार्यकाळ संपल्यामुळे त्यांना सहा महिन्याची मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत हि मुदतवाढ रद्द करून १५ जुलैला अध्यक्ष, उपाध्यक्षांची यांची निवडणुक घेण्याची घोषणा केली. या घोषणेमुळे आता पुन्हा निवडणुकीचे वेध लागले आहेत. नगरसेवकांनी मोर्चेबांधणी सुरू केली असल्याचे चित्र आहे.

 

** आकोट नगराध्यक्षपदासाठी दोन महिला दावेदार

 

आकोट : विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर नगराध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीला महत्त्व आले आहे. येत्या १५ जुलै रोजी ही निवडणूक पार पडणार आहे. आकोट नगर परिषदचे नगराध्यक्षपद अनुसूचित जाती महिलाकरिता राखीव आहे. पालिकामध्ये या आरक्षणास पात्र केवळ दोन महिला उमेदवार आहेत. यामध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश घेतलेल्या उमेदवार व राष्ट्रवादी काँग्रेसचा एका उमेदवाराचा समावेश आहे. त्यामुळे नगराध्यक्ष निवडीकरिता प्रत्येक उमेदवार आपापल्या परीने फिल्डिंग लावत आहे. आकोट नगर परिषदमध्ये ३१ सदस्य संख्याबळ आहे. त्यामध्ये काँग्रेसचे १३, शहर सुधार आघाडी १0, भाजपचे २, शिवसेना १, राष्ट्रवादी १, भारिप-बमसं ४ असे पक्षीय बलाबल आहे; परंतु शहर सुधार आघाडीच्या ललिताताई तायडे या नगरसेविकेने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश घेतल्याने काँग्रेसचे सर्वाधिक १४ संख्याबळ पालिकामध्ये आहे. अडीच वर्षाच्या उर्वरित कालावधीकरिता पालिकामध्ये ललिताताई तायडे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनीताताई चंडालिया ह्या नगराध्यक्ष पदाकरिता आरक्षणानुसार पात्र ठरत आहेत. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराने आपले संख्याबळ जमा करणे सुरू केले आहे. ललिताताई तायडे ह्या कॉंग्रेस पक्षावर निवडून आलेल्या नाहीत, मात्र काँग्रेसने त्यांना आपल्या पक्षात प्रवेश देऊन संख्याबळ वाढविले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनीताताई चंडालिया यांची साथ घेत उर्वरित नगरसेवकांची जुळवाजुळव करीत काँग्रेस पक्षाने भारिप-बमसं पक्षाचे नगराध्यक्ष भाऊराव अंबडकार याच्यावर अविश्‍वास पारित केला होता. त्यानंतर नगराध्यक्षपदी कॉंग्रेसचे रामचंद्र बरेठिया विराजमान झाले; परंतु आता पुढील अडीच वर्ष कालावधीकरिता नगराध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक पुन्हा होऊ घातली आहे. नगराध्यक्ष निवडणुकीकरिता नेते मंडळी तयारीला लागली आहे; परंतु उपाध्यक्षाच्या नावावर शिक्कामोर्बत करण्यावरून धुसपूस सुरू आहे. काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या निर्णयानंतर नगरसेवकांचा जथ्था सहलीवर अज्ञातस्थळी रवाना होणार आहे; परंतु ही निवडणूक भविष्यात सर्व पक्षाकरिता राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे पक्षीय नेत्यांच्या निर्णायक भूमिकेकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

 

** बाळापूर न.प.मध्ये रस्सीखेच

 

बाळापूर: नगर परिषदेच्या दुसर्‍या अडीच वर्षातील नगराध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक येत्या १५ जुलै रोजी होणार असून, बाळापुरात सत्ताधारी नगरविकास आघाडी आणि विरोधी गट असलेल्या परिवर्तन पॅनलदरम्यान जोरदार रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. पूूर्वीचे नगराध्यक्ष आणि उपाध्यक्षांची मुदत ५ जुलै रोजी संपुष्टात आल्यानंतर सोमवार, ७ जुलै रोजी जिल्हा प्रकल्प अधिक ार्‍यांनी नगराध्यक्ष पदाचा प्रभार स्वीकारला. बाळापूर नगरपरिषदेत सदस्य संख्या २१ असून, सत्ताधारी नगरविकास आघाडीकडे ११, तर विरोधी गट असलेल्या परिवर्तन पॅनलकडे १0 सदस्य आहेत. या नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद नगरविकास आघाडीक डेच आहे. यावेळी दोन्ही गटांकडून नगराध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीची चांगली मोर्चेबांधणी सुरू आहे. अध्यक्षपदासाठी नगरविकासकडून सै. ऐनोद्दिन खतिब, तर परिवर्तन पॅनलकडून डॉ. फै य्याज अन्सारी यांची नावे समोर आली आहेत. नव्या कार्यक्रमानुसार ११ जुलै रोजी सकाळी १0.00 ते २.00 वाजेपर्यंत अध्यक्षपदासाठी नामनिर्देशन दाखल करण्यात येतील. दुपारी २.00 ते ५.00 दरम्यान अर्जांची छाणणी, तर १२ जुलै रोजी १0.00 ते २.00 दरम्यान अर्ज मागे घेता येतील. त्यानंतर १५ जुलै रोजी दुपारी २.00 वाजता विशेष सभेत अध्यक्ष, उपाध्यपदाची निवडणूक होईल. या विशेष सभेचे अध्याशी अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी राम लठाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभेपूर्वी होत असलेल्या नगराध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागून असून, बाळापुरात नगराध्यक्ष कुठल्याही गटाचा झाला तरी, तो काँग्रेसचाच असणार आहे. उपाध्यक्षपद मात्र भाजपक डे जाण्याची दाट शक्यता आहे.

 

** तेल्हारा न.प.मध्ये सत्ताधारी भाजप-शेतकरी पॅनलची कसोटी

 

तेल्हारा: नगराध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक येत्या १५ जुलै रोजी होणार असल्याचे जाहीर झाले असून, यावेळेस भाजप आणि शेतकरी पॅनलला आपली सत्ता कायम राखण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर शासनाने महापौर, उपमहापौर, नगराध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांच्या निवडणुकीला सहा महिने मुदतवाढ दिली होती; परंतु नंतर सुधारित अध्यादेश काढून न.प. अध्यक्ष, उपाध्यक्षांची मुदत ५ जुलै रोजी संपुष्टात आली असून, नगराध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक १५ जुलै रोजी घेण्याचे जाहीर के ले आहे. या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, या कार्यक्रमानुसार ११ जुलै रोजी सकाळी १0.00 ते २.00 वाजेपर्यंत नामनिर्देशन दाखल करता येतील, तर १२ जुलै रोजी नामनिर्देशन मागे घेण्याची प्रक्रिया पार पडणार असून, १५ जुलै रोजी अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. उपाध्यक्षपदाकरिता १५ जुलै रोजीच सकाळी १0.00 ते १२.00 वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येतील. अडीच वर्षांपूर्वी झालेल्या तेल्हारा नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपने स्वबळावर निवडणूक लढवून १७ पैकी ७ जागा पटकावल्या होत्या, तर शेतकरी पॅनलला ३ जागा मिळाल्या होत्या. भाजपने शेतकरी पॅनलला सोबत घेऊन न.प.ची सत्ता काबीज केली. मात्र वर्षभरानंतर झालेल्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शेतकरी पॅनलचा एक सदस्य फुटल्याने भाजप-शेतकरी पॅनलला मोठा धक्का बसून, त्यांना सत्ता राखणेही कठीण झाले होते. आजच्या घडीला तेल्हारा न.प.मध्ये सत्ताधारी भाजप-शेतकरी पॅनलकडे ९ सदस्य असून, काँग्रेसकडे ३, राकाँकडे ३ आणि भारिप-बमसंकडे २ सदस्य आहेत. नगराध्यक्षपद मागास प्रवर्गासाठी राखीव असल्याने भाजपमधून प्रतिभा गणेश सपकाळ, जयश्री गोविंद पुंडकर व कान्होपात्रा रामभाऊ फाटकर या अध्यक्षपदासाठी दावेदार असल्याचे समजते. तथापि, सत्ताधारी पक्षांकडे काठावरचे बहुमत असल्याने फोडाफोडीचे राजकारण झाल्यास त्यांना सत्ता राखणे कठीण होऊ शकते

 

. ** पातूर न.प.ची सत्ता राकाँकडेच राहण्याची शक्यता

 

पातूर: राज्यभरातील नगर परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक येत्या १५ जुलै रोजी होणार असून, पातूर नगर परिषदेत गटबाजीच्या राजकारणानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसकडेच सत्ता राहण्याची शक्यता आहे. पातूर नगर परिषदेत सदस्य संख्या १७ असून, २0११ मध्ये पार पडलेल्या नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत स्थानिक आघाडीचे ७, राष्ट्रवादी काँग्रेसचे ४, भाजपचे २, काँग्रेसचे २, तर इतर २, सदस्य निवडून आले होते. त्यावेळी दोन्ही स्थानिक आघाडीच्या एकूण ९ उमेदवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश के ल्यामुळे राष्ट्रवादीचे संख्याबळ १३ होऊन पातूर नगर परिषदेवर त्यांची सत्ता आली. अध्यक्षपदी झिनत कौसर राहतअली यांची, तर उपाध्यक्षपदी मेघा काळपांडे यांची निवड करण्यात आली; परंतु सध्याच्या घडीला सत्ताधारी गटात फूट पडून दोन गट निर्माण झाले असून, राष्ट्रवादीचे चार सदस्य असलेल्या गटात इतर चार मिळून ८ सदस्य आहेत, तर दुसर्‍या गटात ५ सदस्य आहेत. तथापि, काँग्रेस पक्षाचे दोन सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याची चिन्हे दिसत असल्यामुळे राष्ट्रवादीचे संख्याबळ १0 होऊन पातूर न.प.मध्ये पुन्हा राष्ट्रवादीचीच सत्ता राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, पातूरच्या नगराध्यक्षपदाचा प्रभार तहसीलदार राजेश वजिरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. नगराध्यक्ष आणि उपाध्यक्षपद निवडणुकीच्या नव्या कार्यक्र मानुसार येत्या ११ जुलै रोजी सकाळी १0.00 ते २.00 वाजेपर्यंत नामनिर्देशन दाखल करता येतील, तर १२ जुलै रोजी नामनिर्देशन मागे घेण्याची प्रक्रिया पार पडणार असून, १५ जुलै रोजी अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. उपाध्यक्षपदाकरिता १५ जुलै रोजीच सकाळी १0.00 ते १२.00 वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येतील. या निवडणुकीत अध्याशी अधिकारी म्हणून पातूरचे तहसीलदार काम पाहणार आहेत.

 

** मूर्तिजापुरात राजकीय हालचालींना वेग

 

मूर्तीजापूर : नवीन नगराध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडीसाठी ५ जुलै ही तारीख निश्‍चित झाल्याने २१ सदस्यीय या नगरपालिकेत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नगराध्यक्ष पदासाठी पवन अशोक अव्वलवार, शिवसेना शहर प्रमूख विनायक गुल्हाने, पुष्पा वरोकार, पुष्पा मोहोड व उपाध्यक्ष आतिष महाजन यांची नावे चर्चेत आहेत. तर उपाध्यक्षपदासाठी जिल्हा नियोजन समिती सदस्य इब्राहिम घाणीवाला प्रबळ दावेदार आहेत. सध्यास्थितीत येथे राष्ट्रवादी कॉग्रेसची सत्ता आहे. एकूण २१ सदस्याची समिती असून यामध्ये दोन स्वीकृत सदस्य आहेत. राकॉचे ७, अपक्ष ३, कॉग्रेस १, भारिपबमसं ५ शिवसेना ३ व भाजपा २ अशी स्थिती आहे. नगराध्यक्षपदी तबस्सूम निजामोद्दीन तर उपाध्यक्षपदासाठी आतिष महाजन कार्यरत आहेत. गटनेतेपद पवन अव्वलवार यांना देण्यात आले होते. दोन वर्ष कालावधी पूर्ण केल्यानंतर व्दारकाप्रसाद दुबे यांनी पदभार तबस्सूम निजामोद्दीन यांच्याकडे सोपविला होता. मूर्तीजापूरात रस्ते आणि पाण्याची मोठी समस्या असल्यामुळे येणार्‍या नगराध्यक्ष आणि उपाध्यक्षांकडून जनतेला आशा आहे.

Web Title: City council elections, political movements speed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.