कवठा केंद्रावर लसीकरण बंद केल्यामुळे नागरिकांचा हिरमोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:23 IST2021-07-07T04:23:45+5:302021-07-07T04:23:45+5:30
उरळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डाॅ. हर्षाली ताडे यांच्या मार्गदर्शनात आरोग्य कर्मचारी सकाळी १० वाजता ग्रामपंचायत कार्यालयात दाखल ...

कवठा केंद्रावर लसीकरण बंद केल्यामुळे नागरिकांचा हिरमोड
उरळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डाॅ. हर्षाली ताडे यांच्या मार्गदर्शनात आरोग्य कर्मचारी सकाळी १० वाजता ग्रामपंचायत कार्यालयात दाखल झाले. मात्र या ठिकाणी नेटवर्क कनेक्टिविटीमध्ये अडथळा येत असल्यामुळे लसीकरण ऑनलाईन नोंदणीला विलंब होत होता. लसीकरणाकरिता १८ ते ४४ वयोगटातील स्थानिकांची गर्दी तर होतीच. याशिवाय बाहेरगावच्या नागरिकांनी केंद्रावर गर्दी केल्यामुळे गाेंधळ उडाला होता. रांगेत ताटकळत बसणाऱ्या तरूणांनी नियमाप्रमाणे लसीकरण करण्याची मागणी केली. मात्र गोंधळ वाढत गेल्यामुळे २०९ लसींनंतर आरोग्य विभागाने लसीकरण बंद केले. यामुळे नागरिकांना लसीशिवाय परतावे लागले. एकीकडे लसीकरणाकरिता उदासीनता असताना, दुसरीकडे लस असूनही नागरिकांना परत जावे लागत असल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.
लसीकरण केंद्रावर रांगेत उभे राहून माझे आधारकार्ड नोंदणीकरिता दिले होते. मात्र काही लोक रांगेत न लागताच लस घेत असल्याने, तरूणांनी गोंधळ केला व नियमाप्रमाणे लस देण्याची मागणी केली. आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस उपलब्ध असूनही लसीकरण थांबविले. त्यामुळे लस न घेताच परत जावे लागले.
-संतोष भीमराव घ्यारे, नागरिक कवठा