रविवार बाजारात नगरपालिका शॉपींग कॉम्प्लेक्सच्या मागे असलेले मटन मार्केट पूर्वीपासून तेथे सुरु आहे. त्यामुळे त्या ठिकाणी असलेले काडीकचरा व घाण स्वच्छ करुन तेथे मुरुम टाकण्यात येईल व त्या मार्केटमध्ये नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने वेळोवेळी फवारणी करण्याकडे आपण लक्ष घालू, या मटन मार्केटमुळे येथील व परिसरातील नागरिकांच्या आरोग्यात पर्यायी व्यवस्था करुन सदर मटन मार्केट अन्यत्र हलविण्याबाबत नगर पालिका प्रयत्न करेल. वसंत इंगोले मुख्याधिकारी न.प.वाशिम मटन मार्केटच्या प्रवेशद्वारालगत व परिसरात असलेली अस्वच्छता. मटन मार्केटच्या मागे भिंतीलगत केरकचरा व कोंबडीच्या पिसांचे ढीग. वाशिम : स्थानिक रविवार बाजार स्थित नगर परिषद शॉपींग कॉम्प्लेक्स लगतच असलेल्या मटन मार्केट परिसरात सतत अस्वच्छता व घाण राहत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे सदर मटन मार्केट गावाबाहेर हलविण्यात यावे, अशी मागणी शहरवासीयांकडून केली जात आहे. वाशिम हे जिल्हय़ाचे मुख्यालय असून, शहराच्या मधोमध रविवार बाजार येथे नगरपालिकेच्या व्यापारी संकुलला लागूनच मटन मार्केट बांधण्यात आले आहे. मटन मार्केट मध्यवस्तीत असून, या परिसरात सतत घाणीचे साम्राज्य राहते, त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. या मटन मार्केटमध्ये जाण्यासाठी असलेल्या रस्त्याला लागूनच येथे मोठी विहीर असून या विहिरीतून नालसाहेबापुरा, शिवाजी मार्ग, पाटणी चौक, या परिसरात नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असतो. या विहिरींमध्ये मटन मार्केटमधील मांस तुकडे व इतर घाण टाकली जात असल्यामुळे याचा परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. या मटन मार्केटच्या घाणीमुळे व दुर्गंधीमुळे शॉपींग कॉम्प्लेक्समधील दुकानदारासह येथे येणारे ग्राहक व अवागमन करणारे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे मटन मार्केट शहराच्या मध्यभागातून हलवून अन्यत्र गावाबाहेर स्थलांतरीत करावे, अशी नागरिक मागणी करीत आहे. (प्रतिनिधी) |