नागरिकांसाठी अधिकारी व पदाधिका-यांना द्यावा लागेल वेळ!

By Admin | Updated: February 4, 2016 01:31 IST2016-02-04T01:31:26+5:302016-02-04T01:31:26+5:30

सामान्य प्रशासन विभागाचे आदेश; शहरी व ग्रामीण स्थानिक संस्थांमध्ये अंमलबजावणी.

Citizen officials and officials will have to pay the time! | नागरिकांसाठी अधिकारी व पदाधिका-यांना द्यावा लागेल वेळ!

नागरिकांसाठी अधिकारी व पदाधिका-यांना द्यावा लागेल वेळ!

नीलेश शहाकार/बुलडाणा : जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगर परिषदांमधील अधिकारी व पदाधिकार्‍यांना भेटण्यासाठी येणार्‍या नागरिकांना निश्‍चित वेळ देऊन त्यांना पासेस द्याव्या लागणार आहेत. यासाठी कार्यालयात त्याची लेखी नोंदही घेतली जाईल. सामान्य प्रशासन विभागाकडून २ फेब्रुवारी रोजी संबंधित कार्यालयांना या सूचना देण्यात आल्या आहेत.
ग्रामपंचायत स्तरापासून ते महापालिका क्षेत्रामध्ये येणार्‍या नागरिकांना विविध कामांसाठी कार्यालयाशी तसेच संबंधित अधिकार्‍यांशी दररोज संबंध येतो, त्यामुळे कार्यालयांमध्ये मोठी गर्दी होते; परंतु अनेकदा अधिकारी व पदाधिकार्‍यांना कामाच्या व्यस्ततेमुळे नागरिकांना भेटण्यासाठी वेळ मिळत नाही. परिणामी, कामांसाठी आलेल्या नागरिकांचा यामुळे वेळ वाया जातो. नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी यापूर्वी २७ मे २0१३ च्या परिपत्रानुसार प्रत्येक शासकीय कार्यालयातील अधिकार्‍यांनी जनतेच्या भेटीसाठी दुपारी २.३0 ते ३.३0 हा वेळ नागरिकांच्या भेटीसाठी राखीव ठेवावा, अशा सूचना करण्यात आल्या होत्या; परंतु ज्यावेळी नागरिक संबंधित अधिकार्‍यांकडे भेटीसाठी येतात, त्यावेळी संबंधित अधिकारी जागेवर उपलब्ध नसतात, अशा तक्रारी वाढत असल्याने शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने २ फेब्रुवारी रोजी नव्याने सूचना दिल्या आहेत.

पासेस मिळणार !
जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगर परिषदेमधील अधिकारी व पदाधिकार्‍यांच्या कार्यालयातील उपस्थितीबाबत सूचना मध्यवर्ती फलकावर रोज लावण्यात येईल. शिवाय कामांसाठी येणार्‍या प्रत्येक नागरिकाची नावासह रजिस्टरमध्ये नोंद घेतली जाईल, तसेच अधिकार्‍यांनी विशिष्ट कामासाठी दिलेली वेळ निश्‍चित करून त्यांच्या नोंदणी पासेस नागरिकांना मिळतील.

Web Title: Citizen officials and officials will have to pay the time!