चुरड्याने मिरचीला मरगळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2016 02:17 IST2016-04-04T02:17:21+5:302016-04-04T02:17:21+5:30
विदर्भात दोन हजार कोटींवर नुकसान; आता अकोला जिल्ह्यात लागण.

चुरड्याने मिरचीला मरगळ!
राजरत्न सिरसाट/अकोला
देशांतर्गत उत्पादनात मोलाचा वाटा असलेल्या राज्यातील मिरची पिकावर आलेल्या चुरडा-मुरडा (लीफ कर्ल व्हायरस) रोगाने मिरचीचे यावर्षी सर्वाधिक नुकसान केले. त्यातच बोगस बियाणे शेतकर्यांच्या माथी मारले गेल्याने विदर्भात नुकसानाचा आकडा दोन हजार कोटींवर गेला आहे. मिरचीचा पिच्छा न सोडणार्या चुरड्याने आता पश्चिम विदर्भात आक्रमण केले आहे. अकोला जिल्ह्यात मिरचीवर या रोगाची लागण झाल्याने अगोदरच खरीप, रब्बी पिके हातची गेल्याने गलितगात्र झालेला शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला आहे.
गेल्यावर्षी पाऊस कमी झाल्याने पांढरी माशी, मावा, तुडतुडे या रस शोषण करणार्या किडींचा प्रादुर्भाव वाढला होता. ही रस शोषण करणारी कीड स्थलांतर करीत असल्याने मिरचीवर आलेल्या या किडीने चुरडा रोगाचा मोठय़ा प्रमाणावर प्रसार झाला. चुरडा-मुरडा रोगाला पोषक वातावरण निर्माण झाल्याने या रोगाने यावर्षी विदर्भात ७0 ते ८0 टक्के मिरचीचे नुकसान झाले आहे. मिरची हे परागीकरण होणारे पीक असून, दरवर्षी नवीन बियाणे मिळवावे लागत असल्याने विदर्भातील बहुतांश शेतकरी भिवापुरी, मलकापुरी व इलिचपुरी या पारंपरिक मिरचीसोबतच संकरित मिरचीचे उत्पादन घेण्याकडे वळला आहे. संकरित मिरचीचे उत्पादन एकरी दीडशे क्विंटलच्या वर असल्याने विदर्भात संकरित मिरचीची लागवड अलीकडे वाढली आहे.
राज्यातील मिरचीचे क्षेत्र जवळपास १ लाख २५ हजार हेक्टरवर आहे. यातील सर्वाधिक ७५ हजार हेक्टर क्षेत्र हे विदर्भात आहे. पूर्व विदर्भातील नागपूर विभागात ५५ हजार, तर अमरावती विभागात २0 हजार हेक्टरच्या जवळपास हे क्षेत्र आहे. त्यानंतर नंदुरबार, कोल्हापूर, धुळे, जळगाव खान्देश, मराठवाडा व सोलापूर जिल्ह्यात मिरची पीक घेतले जाते.२ दरम्यान,शेतकर्यांना गेल्या वर्षीच्या कमी पावसाचा फटका तर बसलाच, शिवाय या पिकाला रोगाने ग्रासल्याने यावर्षी संकरित मिरचीपासून मिळणार्या एकरी दीडशे ते दोनशे क्विंटल मिळणार्या उत्पादनात ७0 ते ८0 टक्के घट झाली आहे. सरळ वाणापासून एकरी उत्पादन शंभर क्विंटलच्या जवळपास होते; तेही घटले आहे. आता चुरड्याचा प्रसार पश्चिम विदर्भात होत असून, अकोला जिल्ह्यातील दानापूर व इतर भागांमध्ये या रोगाने हातपाय पसरल्याने शेतकर्यांची चिंता वाढली आहे.
काय आहे चुरडा?
चुरडा झाडाचे रस शोषण करीत असल्याने मिरचीची पाने चुरड्यासारखी होतात. झाडाची प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया मंदावते. परिणामी, मिरचीवर निर्माण करणारा फुलोरा गळून पडतो. त्यामुळे उत्पादनात तीव्र स्वरू पाची घट येते.