झारखंडचा चिमुरडा महिन्यापासून अकोल्यात
By Admin | Updated: October 12, 2014 00:28 IST2014-10-12T00:28:13+5:302014-10-12T00:28:32+5:30
रेल्वे सुटली : घरी सोडण्यास कोणी पुढे येईना.
_ns.jpg)
झारखंडचा चिमुरडा महिन्यापासून अकोल्यात
आगाखान पठान / बाभूळगाव जहागीर (अकोला)
मोठय़ा भावासोबत रोजगाराच्या शोधात रेल्वेने मुंबईला जाणारा झारखंडमधील १२ वर्षीय मुलगा अकोला स्टेशनवर पाणी पिण्यासाठी उतरला. मात्र रेल्वे सुटल्याने तो स्टेशनवरच राहिला. मागील एका महिन्यापासून अकोला तालुक्यातील एका कुटुंबाकडे आश्रयास आहे.
झारखंडमधील सायबगंज जिल्हय़ातील मिर्झा चौकी गावातील सोनुकुमार छोटू नोनिया असे या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. मुंबईला जाताना, रात्री अकोला रेल्वेस्थानकावर गाडी थांबली. पाणी पिण्यासाठी सोनु एकटाच खाली उतरला. पाणी शोधत असतानाच रेल्वे सुटली. त्याने गाडी पकडण्याचा प्रयत्न केला; पण तो व्यर्थ ठरला. मोठा भाऊ झोपलेला असल्यामुळे त्याच्याही लक्षात आले नाही. भांबावलेला सोनु रेल्वे स्थानकावर रडत राहिला. गावाला कसे परत जावे, गाडी पकडण्यासाठी पैसे कोठून आणावे, या विवंचनेमुळे तो रेल्वे रूळाने परत चालू लागला. तो यावलखेड रेल्वे स् थानकाजवळ आला. तिथे सिसा बोंदरखेडचे पोलीस पाटील सिंधू बाबाराव डोंगरे यांनी विचारपूस केली असता, त्याने हकिकत कथन केली. त्यांनी बोरगाव मंजू पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी मात्र निवडणुकीच्या बंदोबस्ताचे कारण सांगून, तूर्तास तुम्हीच सांभाळा असा सल्ला दिला. काही दिवस सिंधू डोंगरे यांच्याकडे राहिल्यानंतर तो बोंदरखेड-पांढरी येथील अर्जुन चव्हाण यांच्या घरी राह त आहे. आई-वडिलांपासून दूर असलेल्या सोनुला त्याच्या गावी परत जायचे आहे; परंतु त्याला मदत करण्यास कुणीही पुढे आलेले नाही.
यासंदर्भात बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे ठाणेदार डी. के. आव्हाळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधित कोणतीही घटना माझ्या माहितीत नसल्याचे सांगुण गावात कर्मचार्यांना पाठवून माहिती घेतो, असे म्हटले.