पैशांसाठी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी निवडला सायकलचोरीचा मार्ग!

By Admin | Updated: January 19, 2015 02:37 IST2015-01-19T02:37:27+5:302015-01-19T02:37:27+5:30

अकोला पोलिसांनी सहा जणांच्या टोळीजवळून जप्त केल्या तीन सायकली.

Chimukya students choose money for bicycles! | पैशांसाठी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी निवडला सायकलचोरीचा मार्ग!

पैशांसाठी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी निवडला सायकलचोरीचा मार्ग!

अकोला: चित्रपट, नाटकांमधील बालगुन्हेगारांची कृत्ये पाहून शालेय विद्यार्थ्यांचीही पावले गुन्हेगारीकडे वळत आहेत. गरीब परिस्थितीमुळे आलिशान राहायला आणि जगायला न मिळणारी मुले नकळत गुन्हेगारीकडे ओढली जात आहेत. यासारखेच एक उदाहरण रविवारी सायंकाळी समोर आले. तुकाराम चौक परिसरात सायकल चोरताना एका इसमाने तब्बल सहा शालेय विद्यार्थ्यांना पकडून खदान पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी या विद्यार्थ्यांची चौकशी केली असता, त्यांनी पैशांसाठी सायकल चोरीचा मार्ग निवडल्याचे पोलिसांना सांगितले. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास मलकापूर परिसरातील एका शाळेतील इयत्ता ४ थी व ५ व्या वर्गातील सहा विद्यार्थ्यांना एका इसमाने तुकाराम चौकामध्ये सायकल चोरताना रंगेहात पकडले. ही मुले गयावया करू लागली; परंतु त्या इसमाने कोणतीही दयामाया न दाखवता सहा जणांना खदान पोलीस ठाण्यात आणले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. चिमुकली मुले पाहून पोलिसांनाही आश्‍चर्याचा धक्का बसला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन तुरुंगात बंद करण्याची भीती दाखवली. चिमुकली मुले, पुन्हा अशी चूक होणार नसल्याचे खात्री देत, पोलिसांनी सोडून देण्यासाठी गयावया करू लागली. पोलिसांच्या पाया पडू लागली. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता, त्या सहाही विद्यार्थ्यांनी मलकापूर परिसरातून तीन सायकली चोरल्या असल्याची कबुली दिली. तीन सायकलींपैकी एक सायकल भंगारात विकल्याचेही पोलिसांना त्यांनी सांगितले; परंतु या सहाही विद्यार्थ्यांंची वयोगट पाहून पोलिसांना त्यांची दया आली. गुन्हे दाखल केले तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला धक्का पोहोचेल आणि ते पुन्हा गुन्हेगारीकडे वळतील, या उदात्त हेतूने पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करणे टाळले आणि त्यांच्या आई-वडिलांना बोलावून, मुलांकडे लक्ष देण्यास सांगितले. एवढेच नाहीतर खदानचे ठाणेदार छगनराव इंगळे आणि पोलीस उपनिरीक्षक टिकाराम थाटकर यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या कक्षामध्ये बोलावून, त्यांची कडक शब्दात कानउघाडणी केली आणि पुन्हा सायकल चोरीचे कृत्य केल्यास तुरुंगात टाकण्याची भीती दाखवली. विद्यार्थ्यांंनीही पुन्हा असे कृत्य करणार नसल्याचे आश्‍वासन त्यांना दिले. त्यानंतर पोलिसांनी या सहाही विद्यार्थ्यांंवर कोणतीही कारवाई न करता सोडून दिले. शालेय विद्यार्थ्यांंनी केलेले कृत्य गंभीर आहे. त्यांनी चोरलेल्या सायकली जप्त केल्या असून, सायकलमालकांना त्या सायकली देण्यात आल्या. विद्यार्थ्यांंचे वय आणि त्यांनी नकळत केलेले पाहून, त्यांना आम्ही सोडून दिले. त्यांचेवर गुन्हे दाखल केले असते तर, ते बालगुन्हेगार बनले असते. त्यांना सुधारण्याची संधी दिली पाहिजे, असे खदान पोलीस स्टेशनचे ठाणेदार छगनराव इंगळे यांनी सांगीतले.

Web Title: Chimukya students choose money for bicycles!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.