‘साडेसाती’च्या फे-यात अडकली बालके
By Admin | Updated: November 14, 2014 01:10 IST2014-11-14T00:55:46+5:302014-11-14T01:10:02+5:30
बालकदिन विशेष, दिवसाला होते ३00 ते ४00 रुपयांची कमाई

‘साडेसाती’च्या फे-यात अडकली बालके
राम देशपांडे /अकोला
इतरांच्या कुंडलीतील शनीची साडेसाती दूर करण्यासाठी शनिमंत्राचा जाप करून दान-दक्षिणा गोळा करणार्या बालकांचे प्रमाण अलिकडच्या काही वर्षांमध्ये वाढत चालले आहे. यात ग्रामीण भागातील बालकांचा भरणा अधिक असून, आर्थिक चणचण दूर करण्याच्या उद्देशाने दर शनिवारी व अमावस्येला शहरात वणवण फिरणारी ही बालके स्वत: मात्र दुर्दैवाच्या साडेसातीच्या फेर्यात अडकत चालली आहेत. शनी आणि मंगळ हे दोन ग्रह पृथ्वीपासून अब्जावधी मैल अंतरावर असले तरी शनीची साडेसाती व पत्रिकेतील मंगळ असल्याचे सांगताच भलीभली हबकून जातात. शनीच्या साडेसातीला सारेच वचकून असल्याने, त्याला प्रसन्न करण्यासाठी भक्तमंडळीकडून शनी मंदिरांमध्ये उडीद व तेलाचा अभिषेक केला जातो. दारोदार फिरून दान-दक्षिणा गोळा करण्याची प्रथा याच धार्मिक भावनेतून रूढ झाली असावी कदाचित! शनिमंत्राचा जाप करीत दारोदारी दान-दक्षिणा गोळा करणार्यांमध्ये १८ वर्षांखालील बालकांचा अधिक समावेश असून, यात ग्रामीण भागातील बालकांचा भरणा अधिक असल्याचे दिसून येत आहे. अकोला शहरात अशा पद्धतीने दान-दक्षिणा गोळा करणार्या बालकांशी संवाद साधला असता, दिवसाला ३00 ते ४00 रुपये पदरी पडत असल्याचे त्यांच्याकडून स्पष्ट झाले. मिळालेल्या पैशातून स्व:च्या आर्थिक गरजा भागविण्याकडे त्यांचा सर्वाधिक कल दिसून आला. जवळपास सर्वांच्या कुटुंबीयांना आपलं मूल अशा पद्धतीने दान-दक्षिणा मागून आणत असल्याचे माहीत असल्याने, कुटुंबात कुणीही रोकटोक करणारे नसल्याने, नकळत खेळण्या-बागडण्याच्या वयातल्या या बालकांचं शैक्षणिक भविष्य अंधारात ओढले जात आहे. एकीकडे मंगळावर यान धाडणार्या या देशाचं भवितव्य, अर्थात ही लहान बालकेच शनीच्या साडेसातीच्या फेर्यात अडकत चालली आहेत.