बाल विकास समितीकडून अत्याचारप्रकरणाची ‘चिरफाड’
By Admin | Updated: April 2, 2015 02:24 IST2015-04-02T02:09:19+5:302015-04-02T02:24:41+5:30
महिला व बाल कल्याण समितीसमोर कर्मचा-यांची पेशी; नवोदय कर्मचा-यांच्या जबाबानुसार १0 दिवस दडविली माहिती.

बाल विकास समितीकडून अत्याचारप्रकरणाची ‘चिरफाड’
सचिन राऊत/अकोला : जवाहर नवोदय विद्यालयातील ४९ विद्यार्थिनींच्या लैंगिक छळ प्रकरणाची माहिती तब्बल १0 दिवस दडविण्यात आल्याचे समोर आले आहे. महिला व बाल विकास समितीने नवोदय विद्यालय कर्मचार्यांचे जबाब नोंदविले असून, प्रत्येकाच्या जबाबात तफावत असलेली उत्तरं समोर आलीत. २१ मार्चला तक्रार झाल्यानंतरच पॉस्को अँक्ट आणि लैंगिक छळाची कारवाई करणे बंधनकारक होते; मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे नवोदय विद्यालय प्रशासनाने केलेल्या दिरंगाईची चिरफाडच समितीने बुधवारी केली. नवोदय विद्यालयात विद्यार्थिनींचा लैंगिक छळ होत असल्याची तक्रार एका विद्यार्थिनीने २१ मार्च रोजी केली. त्यानंतर २३ मार्च रोजी आणखी दुसर्या विद्यार्थिनीने लैंगिक छळाची तक्रार केली, मात्र या प्रकरणाची थातूर-मातूर चौकशी करून केवळ कागदी घोडे नाचविण्याचे काम प्रशासनाने केले. वस्तुस्थिती लक्षात घेता, या शिक्षकांवर पॉस्को अँक्ट आणि लैंगिक छळप्रकरणी तातडीने फौजदारी कारवाई करणे बंधनकारक होते; मात्र प्रशासनाने याकडे सपशेल कानाडोळा केल्याचे बाल विकास समितीने बुधवारी केलेल्या चौकशीत समोर आले. मुलींच्या शरीरावर हात लावल्यास किंवा तिच्या अंतर्भागाला ठेस पोहोचेल असा कुठलाही प्रकार केल्यास त्या दोषींवर तात्काळ पॉस्को अँक्ट २0१२ नुसार कारवाई करण्याचे निर्देश आहेत; मात्र नवोदय विद्यालय प्रशासनाकडे २१ मार्च रोजी तक्रार झाल्यानंतरही त्यांनी १ एप्रिलपर्यंत केवळ कागदोपत्रीच कारभार हाकला. आर. बी. गजभिये आणि शैलेश रामटेके या दोन शिक्षकांव्यतिरिक्त आणखी दोन शिक्षकही विद्यार्थिनींना अशाच प्रकारे वागणूक देतात, अशी स्पष्ट कबुलीच महिला कर्मचार्यांनी महिला व बाल विकास समितीने केलेल्या चौकशीसमोर दिली. महिला व बाल विकास अधिकारी विशाल जाधव, महिला व बाल कल्याण समितीच्या सदस्य अँड. संगीता भाकरे आणि अनिता गुरव, जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या विधी अधिकारी सीमा भाकरे, बाल विकास प्रकल्प अधिकारी राजश्री कौलखेडे यांनी नवोदय विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांची ह्यपरेडह्णच घेतली. यामध्ये त्यांनी प्रत्येक कर्मचार्याची चौकशी केली. यामध्ये सर्व काही संशयास्पद असल्याचे समोर आले. मुलींच्या तक्रारींकडे कानाडोळा करणे, लॅबमध्ये पलंग व गादी ठेवणे, वर्ग सुटल्यानंतर एकएका विद्यार्थिनीला वर्गात बोलावणे हे प्रकार सर्वांसमोर होत असतानाही त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे काही कर्मचार्यांच्या बयाणातूनच समोर आले आहे. बाल विकास समितीने बुधवारी कसून चौकशी केल्यानंतर हे गंभीर प्रकार समोर आले आहेत.