बाजारात चिक्कार गर्दी; अकाेलेकरांना गांभीर्यच नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:18 IST2021-03-26T04:18:40+5:302021-03-26T04:18:40+5:30
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण मनपा क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ११ मधील बैदपुरा परिसरात आढळून आला होता. तेव्हापासून ते ...

बाजारात चिक्कार गर्दी; अकाेलेकरांना गांभीर्यच नाही!
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण मनपा क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ११ मधील बैदपुरा परिसरात आढळून आला होता. तेव्हापासून ते आजपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी ठोस कृती आराखडा तयार करून त्यानुसार परिस्थिती हाताळणे अपेक्षित असतानाच सर्वसामान्य नागरिकांनीसुद्धा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे भाग आहे. या ठिकाणी नेमके उलटे चित्र पाहावयास मिळत आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढत चालला असताना शहरात बाजारपेठेमध्ये अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी अकोलेकर गर्दी करीत आहेत. बाजारपेठेत नागरिकांकडून कोणत्याही नियमांचे पालन केले जात नसल्याचे दिसून येत आहे.
...तरच कोरोनाला लगाम लावता येईल!
कोरोनाचा मुकाबला केला जात असताना दुसरीकडे व्यापार-उद्योग सुरू असले पाहिजेत याबद्दल दुमत नाही. परंतु बाजारपेठ उघडल्यानंतर संबंधित व्यवसायिकांनी तसेच ग्राहकांनीसुद्धा कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नियमांचे तंतोतंत पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. तरच कोरोनाला लगाम लावता येणार असून, त्यासाठी आता अकोलेकरांनीच पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
गैरसोय टाळावी हा उद्देश; पण...
सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय टाळावी या उद्देशातून जिल्हा प्रशासनाने बाजारपेठ खुली ठेवण्यासाठी सायंकाळी ५ पर्यंतची मुदत दिली. परंतु यादरम्यान संबंधित दुकानदार, व्यावसायिक यांच्याकडून सोशल डिस्टन्सिंगचे कोणतेही पालन केले जात नसल्याचे चित्र समोर आले आहे. मनपा प्रशासनाच्या आकस्मिक तपासणीत काही व्यावसायिक व कामगारांनी काेराेना चाचणी केली नसल्याचे उजेडात आले आहे.
पथकांना गर्दी दिसत नाही का?
साेशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना दंड आकारण्यासाठी महापालिका, महसूल व पाेलीस प्रशासनाने संयुक्त पथकांचे गठन केले आहे. गांधी चाैकातील चाैपाटीवर दिवसभर खवय्यांची गर्दी हाेत असताना या पथकांना ही गर्दी दिसत नाही का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
...फाेटाे, टाेलेजी...