चिखलगाव सर्कल बनले अवैध धंद्यांचा अड्डा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:18 IST2021-05-13T04:18:17+5:302021-05-13T04:18:17+5:30
चिखलगावामध्ये बस स्टँड चौकात रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी अवैधरीत्या देशी दारूविक्री होत आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही अवैध देशी दारूविक्रेते ...

चिखलगाव सर्कल बनले अवैध धंद्यांचा अड्डा!
चिखलगावामध्ये बस स्टँड चौकात रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी अवैधरीत्या देशी दारूविक्री होत आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही अवैध देशी दारूविक्रेते सर्रासपणे दारूची विक्री करीत आहे. पातूर ठाण्यातून परवानगी काढली आहे, त्यामुळे आमचे कोणी काहीही करू शकत नाही, असे सांगत, ते दारूची विक्री करीत आहेत. त्यामुळे नागरिकांना त्रास सोसावा लागत आहे. तसेच अवैध वरली मटका जोमात सुरू असल्याने तरुण पिढी व्यसनाधीन मार्गावर वळत असल्याचे चित्र आहे. कापशी रोड येथे अवैध वरली मटक्याला उधाण आले आहे. या अवैध वरली मटक्यावाल्यांनी बस स्टॉपवर व धार्मिक स्थळांवर ठाण मांडले आहे. अवैध धंदे फोफावले असूनही पातूर पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. त्यामुळे अवैध धंदा करणारे निर्ढावले आहेत.
माझोड येथे गावठी दारूचा महापूर
माझोड येथे गावठी दारूचा महापूर आला आहे. येथे बाहेरगावातील तळीराम दारू पिण्यासाठी सदैव रात्री-बेरात्री येतात. लाॅकडाऊनच्या काळात देशी व विदेशी दारू दुकाने बंद आहेत. त्यामुळे गावात दारू पिण्यासाठी तळीराम मोठ्या संख्येने येत आहेत. माझोड गावात यात्रेचे स्वरूप प्राप्त होत असल्याने, गावातील नागरिक त्रस्त झाले आहेत. याकडे पोलिस प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे.
चिखलगाव येथे मोठ्या प्रमाणात देशी, विदेशी व गावठी दारूविक्री करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे. पोलिसांनी कारवाई करावी.
- विठ्ठलराव मेतकर, ग्रामस्थ, चिखलगाव