हद्दवाढीच्या अधिसूचनेवर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी
By Admin | Updated: March 17, 2016 02:38 IST2016-03-17T02:38:43+5:302016-03-17T02:38:43+5:30
प्रधानमंत्री आवास योजनेचा ६२ कोटींचा ‘डीपीआर’ मंजूर; डॉ. रणजित पाटील यांची माहिती.

हद्दवाढीच्या अधिसूचनेवर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी
अकोला: तब्बल १५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर महापालिक ा क्षेत्राच्या हद्दवाढीचा तिढा अखेर निकाली निघाला. हद्दवाढीच्या राजपत्रित अधिसूचनेवर बुधवारी मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केली तसेच मनपा क्षेत्रात पंतप्रधान आवास योजनेच्या ६२ कोटींच्या प्रकल्प अहवालाला (डीपीआर) मुख्य सचिवांनी मंजुरी दिल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिली. ह्यडह्ण वर्ग महापालिका गठित केल्यानंतर नियमानुसार तीन वर्षांच्या आत संबंधित मनपा क्षेत्राची हद्दवाढ करावी लागते. अकोला मनपाची २00१ मध्ये स्थापना झाल्यानंतर चक्क पंधरा वर्षांपर्यंत हद्दवाढच झाली नाही. परिणामी अकोलेकरांच्या मूलभूत सुविधांवर शहरानजीकच्या गावांचा ताण पडत आहे. मनपा आयुक्त अजय लहाने यांनी शहरानजीकच्या २४ गावांचा समावेश करीत हद्दवाढीचा सुधारित प्रस्ताव तयार केला. योगायोगाने नगर विकास राज्यमंत्रिपद जिल्ह्याच्या वाटेला येऊन डॉ.रणजित पाटील, खा. संजय धोत्रे, आ. गोवर्धन शर्मा, आ. गोपीकिशन बाजोरिया, आ. रणधीर सावरकर यांनी महापालिकेच्या हद्दवाढीला अनुकूलता दर्शविल्याने या प्रक्रियेला गती मिळाली. अर्थसंकल्पीय अधिवेशन कालावधीत हद्दवाढीची अधिसूचना जारी होण्याचे संकेत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हद्दवाढीच्या राजपत्रित अधिसूचनेवर बुधवारी स्वाक्षरी केल्याने हा तिढा निकाली निघाला आहे.