मुख्यमंत्री करणार २५0 कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण!
By Admin | Updated: February 1, 2016 02:29 IST2016-02-01T02:29:10+5:302016-02-01T02:29:10+5:30
११ फेब्रुवारीला जिल्हा दौर्यावर; पालकमंत्र्यांनी दिली माहिती.

मुख्यमंत्री करणार २५0 कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण!
अकोला : जिल्हा नियोजन भवन, पंचायत समितीची इमारत, रस्ते, पोलीस ठाण्याच्या इमारती आदींसह २५0 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ११ फेब्रुवारी रोजी होणार आहे. याशिवाय आणखीही काही प्रस्तावित कामांची घोषणा या दौर्यात मुख्यमंत्री करणार असल्याची माहिती पालकमंत्री तथा गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात रविवारी दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौर्याची माहिती दिली. सकाळी ११ वाजता त्यांचे अकोला येथे आगमन होईल. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित समारंभात ते विविध कामांचे भूमिपूजन करणार असून, शासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळाही त्यांच्या हस्ते होईल. दुपारी २.३0 वाजेपर्यंत ते अकोला येथे आयोजित विविध कामांच्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळय़ात सहभागी होणार आहेत. हे सर्व कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातच आयोजित केले जाणार असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली. या पत्रकार परिषदेला जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपविभागीय अधिकारी संजय खडसे आदींची उपस्थिती होती.