गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतले चंडिका देवीचे दर्शन
By Admin | Updated: January 19, 2015 02:36 IST2015-01-19T02:36:04+5:302015-01-19T02:36:04+5:30
गोवा राज्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत परसेकर यांनी कुरणखेड येथील चंडिका देवीचे दर्शन घेतले.

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतले चंडिका देवीचे दर्शन
कुरणखेड (अकोला): खासगी कार्यक्रमानिमित्त वाशिम जिल्हय़ातील कारंजा येथे आलेले गोवा राज्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत परसेकर यांनी रविवार, १८ जानेवारी रोजी परतीच्या प्रवासादरम्यान येथून जवळच असलेल्या कुरणखेडला भेट देऊन चंडिका देवीचे सपत्निक दर्शन घेतले.
परसेकर हे रविवारी त्यांच्या कुटुंबासह वाशिम जिल्हय़ातील कारंजा येथील गुरुमंदिरात दर्शन घेण्यासाठी गेले होते. तेथून खासगी वाहनाने अकोल्याकडे जात असताना त्यांनी राष्ट्रीय महामार्ग क्र. सहावरून जवळच असलेल्या कुरणखेड येथील चंडिका देवी संस्थानला भेट दिली. यावेळी भाजपच्यावतीने प्रशांत ठाकरे, किरण उमाळे, किशोर गावंडे, दत्ता राऊत, अमन महल्ले यांनी त्यांचे स्वागत केले.
चंडिका देवीच्या दर्शनाने उर्जा मिळते, उर्जा प्राप्त करण्यासाठी आपण येथे येत असतो, असे परसेकर यांनी सांगितले.
मंदिराच्या विकासासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही ते म्हणाले. यावेळी संस्थानचे विश्वस्त अरुणराव देशमुख, श्याम अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी नंदकुमार काळे, बोरगाव मंजूचे ठाणेदार डी. के. आव्हाळे, तलाठी इंगळे, अशोक कातखेडे, विनायक गावंडे, सोनु गावंडे, प्रशांत टेकाडे, प्रविण राऊत आदी उपस्थित होते. चंडिका देवीचे दर्शन घेतल्यानंतर परसेकर हे अकोल्याकरिता रवाना झाले.