डेंग्यू की चिकनगुणिया, नागरिक संभ्रमात?
By Admin | Updated: November 13, 2014 00:35 IST2014-11-13T00:35:05+5:302014-11-13T00:35:05+5:30
राज्यात ३३ रूग्णांचा मृत्यू.
_ns.jpg)
डेंग्यू की चिकनगुणिया, नागरिक संभ्रमात?
खामगाव (बुलडाणा): डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने दवाखान्यांमध्ये नागरिकांची गर्दी वाढत असून, ताप डेंग्यूमुळे की चिकनगुणियामुळे अशा संभ्रमात नागरिक सापडले आहेत. संपूर्ण राज्यात डेंग्यूसह चिकनगुणियासदृश आजाराचा प्रकोप वाढल्याने आरोग्य यंत्रणा कामाला लागली असून, अमरावती विभागात डेंग्यूचे ३५0 पेक्षा जास्त रूग्ण आढळल्यामुळे सर्वत्र चिंता व्यक्त होत आहे.
अमरावती विभागात दिवसागणिक डेंग्यू, चिकनगुणियासदृश आजाराच्या रुग्णसंख्येत दिवसागणिक भर पडत असून, राज्यात हजारो रुग्ण या आजाराने प्रभावित झाल्याचे चित्र आहे. डेंग्यू आणि चिकनगुणीया या आजाराच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे अनेक खासगी रुग्णालयांमध्ये आजाराच्या भीतीने नागरिकांची लूट सुरू असल्याचे चित्र आहे. गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत राज्यात साडेतीन हजाराच्यावर संशयित रुग्णांची नोंद झाली असून, त्यापैकी ३३ रुग्ण डेंग्यू या आजाराने दगावले आहेत.
डेंग्यू, चिकनगुणीया या आजाराच्या डासांची उत्पत्ती स्वच्छ पाण्यात होते. दिवसा चावणार्या डांसापासून चिकनगुणीया आणि डेंग्यू या आजाराची लागण होते. दोन्ही आजार व्हायरल असून, संपूर्ण सुरक्षितता राखल्यास या आजारापासून बचाव करता येतो. वेळीच दक्षता घेतल्यास हा आजार पूर्णत: बरा होतो. त्यामुळे नागरिकांनी घाबरता कामा नये. या आजारापासून लहान मुलांचा बचाव करण्यासाठी लहान मुलांना पूर्ण कपडे घालावेत, असे अवाहन निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश टापरे यांनी केले आहे.
*डेग्यू-२ विषाणू सक्रिय!
महाराष्ट्रातील मुंबईसह विविध शहरांमध्ये डेंग्यू या आजाराचे सकारात्मक रुग्ण आढळून येत आहेत. राज्याच्या विविध शहरात आढळलेल्या रुग्णांच्या रक्त नमुन्यात डेंग्यू-२ आणि डेंग्यू-४ प्रकारचे विषाणू आढळून आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
*केंद्राच्या पथकाकडून लवकरच पाहणी
राज्यभर डेंग्यूचे थैमान वाढले आहे. मुंबईसह पुणे, नागपूर, अमरावती, अकोला, नाशिक या शहरांमध्ये डेंग्यूसह विविध आजाराचा प्रादुर्भाव वाढला आहे. एकुणच राज्यातील डेंग्यूसदृश परिस्थितीची केंद्रीय आरोग्य विभागाने गंभीर दखल घेतली आहे. केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाची एक चमू लवकरच राज्यातील विविध शहरातील डेंग्यूसदृश आजाराच्या परिस्थितीची पाहणी करणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.