मृगाच्या पहिल्या पावसाचा अनेक गावांना तडाखा
By Admin | Updated: June 14, 2014 23:31 IST2014-06-12T23:42:03+5:302014-06-14T23:31:07+5:30
मृगाच्या पहिल्याच पावसाने सोबत आणलेल्या वादळात पातूर परिसरातील गावांची पार दैना करून टाकली.

मृगाच्या पहिल्या पावसाचा अनेक गावांना तडाखा
अकोला : मृगाच्या पहिल्याच पावसाने सोबत आणलेल्या वादळात पातूर परिसरातील गावांची पार दैना करून टाकली. मंगळवारी रात्री घरावरील पत्रे उडाले, त्यामुळे अनेक कुटुंबे उघड्यावर आली. या वादळाने अनेक कुटुंबांना तडाखा दिला, तर अनेकांना जखमी केले. काही वृक्ष अध्र्यातून तुटले, तर काही उन्मळून पडले, विजेचे खांब तुटले, तारा जमिनीवर आल्या. बाळापुरात उपविभागीय अधिकारी यांच्या बंगल्यावरील व महामार्गावरील पोलिस चौकीचे टिनपत्रे उडाली. पोलिस वायरलेस संचही जळाला. अनेक गावात विद्युत पुरवठा बंद झाला. परिसरातील शेतकरी आधीच नापिकीमुळे खचून गेले आहेत. अशातच वादळी पावसाचा तडाखा बसल्याने यावर्षाची सुरुवातच धक्कादायक झाल्याची भावना शेतकर्यांनी व्यक्त केली. पातूर तालुका प्रतिनिधी शंकर नाभरे यांनी दिलेल्या माहितीनुसार या पावसाने दिग्रस, खामखेड,आगीखेड, अंधारसांगवी, भंडारज, बोडखा, देऊळगाव, माळराजुरा, सावरगाव, तुलंगा खुर्द, कोठारी, आष्टुल पाष्टुल, खानापूर, कारला, पिंपळडोळी, तुळजापूर, ओंझळवाडी या गावांना पावसाचा तडाखा बसला. काही गावातील घरांची पडझड झालीआहे. टिनपत्रे उडून गेल्याने अनेकांचा संसार रस्त्यावर आला आहे. दिग्रस परिसरात मोठाली वृक्षे उन्मळून पडली असल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे, तसेच घरांच्या पडझडीचे पंचनामे करण्यास प्रशासनाने आदेश दिले आहेत. कालच्या वादळी पावसाने वानरांची मोठी धावपळ झाली. सतत तीन तास पाऊस सुरू असल्याने वन्यप्राणी सैरभैर झालेत. या पावसामुळे शेतातील कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. मूर्तिजापूर प्रतिनिधी दीपक अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील लाखपुरी, सिरसो, माना, कुरू म, जामठी, अनभोरा, दहातोंडा, सांगवी खुर्द, रेपाटखेड या गावांना तुरळक फटका बसला, तर शेलुबोंडे, भटोरी, पारद या परिसरात जास्त पाऊस झाला. लोकांच्या घरावरील टिनपत्रे उडून गेलीत. तालुक्यात मोठे नुकसान झालेले नाही. बाळापूर प्रतिनिधी अनंत वानखडे यांनी सांगितले की, शेगाव रोड परिसरात जास्त पाऊस झाला. एसडीओ कार्यालय, पोलिस चौकीला वादळी पावसाचा फटका बसला. रस्त्यावर वृक्ष उन्मळून पडल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला होता; मात्र प्रशासनाने वाहतूक पूर्ववत केली. विजेचे खांब वाकल्याने तालुक्यातील अनेक गावात वीजपुरवठा खंडित झाला आहे. बार्शिटाकळी प्रतिनिधी जेठाभाई पटेल यांनी दिलेल्या महितीनुसार तालुक्यातील मोरेश्वर सिंदखेड, धाबा, लोहगड, एरंडा, जुनना, खेर्डा भागई, काजळेश्वर, निहिदा, पिंपळगाव चांभारे, पुनोतीखुर्द, परंडा, पाटखेड, वरखेड या गावाला तडाखा बसला.